7 एप्रिलपासून समितीची बैठक : गव्हर्नर संजय मल्होत्रा अध्यक्षस्थानी
वृत्तसंस्था/मुंबई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण समितीची बैठक सोमवार 7 एप्रिलपासून सुरु होणार असून त्यात रेपो दरात कपात होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. सदरच्या बैठकीत रेपो दरात पाव टक्का कपात केली जाईल, असे तज्ञांनी मत नोंदवले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्विमासिक बैठक 7 एप्रिल ते 9 एप्रिल याअवधीत होत असून गव्हर्नर संजय मल्होत्रा हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या बैठकीत रेपो दरात पाव टक्का कपात करत रेपो दर 6.25 टक्के इतका केला. येती बैठक सोमवारपासून सुरु होणार असून 9 एप्रिल रोजी रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. बैठकीत रेपो दरात पाव टक्का इतकी कपात केली जाण्याची शक्यता सिटी बँकेने व्यक्त केलीय. याखेरीज जेपी मॉर्गन व नोम्युरा यांनीही हाच अंदाज वर्तवला आहे. बँक ऑफ अमेरिकाच्या ग्लोबल रिसर्चच्या मते रेपो दर वर्षाअखेरपर्यंत 5.5 टक्क्यांवर आणला जाईल. याचाच अर्थ रिझर्व्ह बँक वर्षाअखेरपर्यंत 1 टक्का इतकी एकंदर रेपोदरात कपात करु शकेल, असेही अंदाजावरुन स्पष्ट होते आहे.









