दर स्थिर अथवा पाव टक्का कपातीचे संकेत : 1 ऑक्टोबरला होणार निर्णय
वृत्तसंस्था/ मुंबई
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सोमवार 29 सप्टेंबरपासून सुरू झाली असून सदरच्या बैठकीमध्ये रेपोदराबाबत चर्चा सुरू झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रेपोदराबाबत निर्णय घेतील.
भारतीय रिझर्व्ह बँकेची तीन दिवसांची पतधोरण समितीची बैठक मुंबईमध्ये सोमवारी सुरू झाली असून 1 ऑक्टोबर रोजी रेपोदराबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झालेली आहे. महागाई, आर्थिक विकास आणि बाजारातील एकंदर स्थितीचा विचार करून रेपो दराबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. मागच्या ऑगस्टच्या बैठकीमध्ये रेपोदर 5.5 टक्के इतका स्थिर ठेवण्यात आला होता. या आधीच्या जूनमधील बैठकीत रेपोदरात 50 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली होती. तज्ञांच्या म्हणण्यानुसार रेपो दर स्थिर ठेवला जाऊ शकतो. काही तज्ञांच्या मते रेपो दरात पाव टक्के कपात केली जाऊ शकते. या संदर्भातला निर्णय काय होतो ते 1 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.
शिरीषचंद्र मुर्मू नवे डेप्युटी गव्हर्नर
याच दरम्यान केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नव्याने शिरीष चंद्र मुर्मू यांची नियुक्ती केली आहे. शिरीष चंद्र मुर्मू हे पुढील तीन वर्षे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पाहतील. केंद्र सरकारच्या अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेट यांच्या मार्फत ही निवड करण्यात आली आहे. 9 ऑक्टोबरपासून ते डेप्युटी गव्हर्नर पदाचा कार्यभार सांभाळतील. रिझर्व्ह बँकेचे सध्याचे डेप्युटी गव्हर्नर राजेश्वर राव यांची ते जागा घेतील. त्यांचा कार्यकाळ 8 ऑक्टोबर रोजी पूर्ण होणार आहे.









