बेळगाव ः
‘मराठा बँकेचे ग्राहक हेच खरे आधारस्तंभ आहेत, बँक त्यांना अधिकाधिक सोयी देत आहे, रिझर्व्ह बँकेच्या धोरणामध्ये दररोज वेगवेगळे बदल होत आहेत. सदर बदलांचा स्वीकार करून बँकेने चालविलेली वाटचाल स्तुत्य आहे’ असे गौरवोद्गार रिझर्व्ह बँक बेंगळूरच्या जनरल मॅनेजर मीनाक्षी गड यांनी मराठा बँकेला दिलेल्या सदिच्छा भेटप्रसंगी काढले. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते.
प्रास्ताविकात संचालक बाळासाहेब काकतकर यांनी बँकेबाबत माहिती देताना सांगितले की, ज्येष्ठ समाज धुरीणांच्या प्रेरणेतून मराठा बँकेची उभारणी झाली आहे, समाजहित लक्षात घेऊनच बँक वाटचाल करीत आहे. आपली बँक बेळगाव जिल्हय़ात पहिल्या क्रमांकावर आहे.
यानंतर चेअरमन दिगंबर पवार, व्हा. चेअरमन नीना काकतकर व संचालिका रेणू किल्लेकर यांच्या हस्ते मीनाक्षी गड यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बँकेचे संचालक बाळाराम पाटील, एल. एस. होनगेकर, बँकेचे कर्मचारी व इतर उपस्थित होते. जनरल मॅनेजर संतोष धामणेकर यांनी आभार मानले.









