ऑक्टोबरमधील स्थिती : एकंदर 882 टन भारताकडे साठा
वृत्तसंस्था/ मुंबई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी नुकतेच 27 टन सोने खरेदी केले असून सध्याला भारताकडे एकूण 882 टन इतके सोने साठ्यात आहे. डब्ल्यूजीसी म्हणजे जागतिक सुवर्ण परिषदेने ही माहिती दिली आहे.
सोने खरेदीच्या बाबतीत जागतिक स्तरावर पाहता चीन हा चौथ्या स्थानावर आणि अझरबैजान हा पाचव्या स्थानावर आहे. कझाकस्तानच्या केंद्रीय बँकेने सलग पाच महिने सोने विक्री केले होते, अखेर ऑक्टोबरमध्ये पुन्हा सोने खरेदीला प्रारंभ करण्यात आला. ऑक्टोबर 2024 मध्ये भारताने इतरांच्या तुलनेत सर्वाधिक 27 टन सोने खरेदी केले आहे. यायोगे भारताचा सुवर्ण साठा 882 टनावर पोहचला आहे. यातला 510 टन सोने हे देशातच साठवण्यात आलेले आहे.
तीन देशांची हिस्सेदारी अधिक
परिषदेने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील केंद्रीय बँकांनी एकंदर 60 टन इतके सोने ऑक्टोबरमध्ये खरेदी केले. याबाबतीत तुर्कियेच्या केंद्रीय बँकेने 17 टन सोने खरेदी केले आहे. यापाठोपाठ पोलंडने 8 टन सोने खरेदी केले आहे. एकंदर जागतिक सुवर्ण खरेदीत पाहता भारतासह तीन देशांचा वाटा 60 टक्के इतका आहे.
ऑक्टोबरपर्यंत 77 टन सोने खरेदी
डब्ल्यूजीसीच्या आकडेवारीनुसार भारताने यंदा जानेवारीपासून ते ऑक्टोबरपर्यंत एकुण 77 टन इतके सोने खरेदी केले आहे. हे प्रमाण मागच्या वर्षाच्या आधारावर पाहता पाचपट अधिक आहे. याचदरम्यान तुर्कियेकडे एकूण सोने साठवणूक 72 टन आणि पोलंडने 62 टनचा टप्पा पार केला आहे. ऑक्टोबरमध्ये जर्मनी, मंगोलीया, जॉर्डन, थायलंड आणि फिलीपीन्स यांच्या केंद्रीय बँकांनी सोने विक्री केल्याची माहिती आहे.









