मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांची सांगलीच्या सभेत घोषणा
प्रतिनिधी/ सांगली
राज्यातील सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळणार आहे. मराठे हे कुणबी असल्याचे दाखले आता सर्वत्र मिळाले आहेत. त्यामुळे सर्व मराठे हे कुणबी आहेत, हे आपोआप सिद्धच झाले आहे. त्यामुळे यापुढे सरसकट मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आहे. हे निश्चित झाले असल्याची घोषणा मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सांगलीत तऊण भारत स्टेडियम येथे भव्य सभेत बोलताना केली.
शुक्रवारी भर उन्हात त्यांनी तब्बल एक तास सभा घेवून आरक्षणाचा विषय कसा संपणार आहे, याची विस्तृत माहिती देत असतानाच यापुढील आंदोलनाची दिशा काय असेल, तेही त्यांनी सांगितले. मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. त्यामध्ये त्यांची सांगलीत भर उन्हात दुपारी तीन वाजता ही सभा झाली. या सभेला सांगलीसह आजू-बाजूच्या गावांतून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आणि महिला-भगिनी उपस्थित होत्या. सांगली शहरात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यातआली.
70 वर्षांपासून मराठा समाजावर अन्याय सुरू
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाला 70 वर्षांपासून आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. मराठा समाजावर 70 वर्ष झाले हा अन्याय सुरू आहे. पण, आता हा अन्याय दूर करण्याची ही निश्चित वेळ आली आहे. सरकारला मराठा बांधवांना कोणत्याही परिस्थितीत सरसकट ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे लागणार आहे.
अन्यायाविरूद्ध निश्चित लढणार
मराठा समाजाच्या नावाचे आरक्षण काही मंडळींनी पळवून नेले आहे. आता त्यांना आमच्या वाट्याचे आरक्षण आम्ही पळवू देणार नाही. मराठा समाजाने आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हे सर्व घडले आहे. पण, आता मराठा समाज शहाणा झाला आहे. तो या अन्यायाविरूद्ध निश्चित लढणार आहे. आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही.
सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत
आम्ही सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सरकारला आपण डिस्टर्ब करून चालणार नाही. सरकारकडून 24 डिसेंबरपर्यंत कागदपत्रे तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कागदपत्रातून त्यांना कुणबी नोंदी आढळून येतील. या नोंदी आढळून आल्यावर ते तात्काळ यावर कायदा करतील, असे आपणास वाटते आहे. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत त्यांना कोणीही डिस्टर्ब करू नका. आपले आंदोलन शांततेत सुरूच ठेवा. एक डिसेंबरपासून साखळी उपोषणाचा टप्पा सुरू होणार आहे. त्यामध्ये सांगलीतील प्रत्येक गावात हे साखळी उपोषण झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आरक्षणासाठी कोणतेही हिंसक आंदोलन करण्याची गरजच लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही : जरांगे-पाटील
माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत एक पाऊलही मागे हटणार नाही. आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आहे. 70 वर्षांपासून आम्ही ही मागणी करतोय. मात्र पुरावे नाहीत, म्हणून आम्हाला आरक्षण डावलण्यात आले. आमचे पुरावे बुडाखाली कोणी दडवून ठेवले?, असा सवाल करीत तुम्ही एकजुटीने रहा. तुमच्यात मतभेद करण्याचा प्रयत्न होईल. त्याला बळी पडू नका. एक डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण सुरू करा. सरकारला आपल्या मागण्यांचा विचार करावाच लागेल, अशी घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी विट्यातील सभेत केली.









