प्रतिनिधी / पुणे
मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावलेला नाही. ओबीसींच्या ताटातले काढून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे कुठलेही अहित झालेले नाही. आमचे सरकार आहे तोवर कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले.
पुणे जिह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या शासकीय जयंती सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की मराठवाड्यात इंग्रजांचे शासन नव्हते. 1948 पर्यंत निजामाचे शासन होते. त्यामुळे मराठवाड्यात एखाद्याला जातीचे प्रमाणपत्र हवे असेल, तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही.
महाराष्ट्रात इतर सगळ्या भागात आपण एखाद्याला जर जातीचे प्रमाणपत्र हवे असेल, तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे, ते आपण काढतो. त्यानुसार जातीप्रमाणे प्रमाणपत्र दिले जाते. परंतु मराठवाड्यात ते मिळत नव्हते. कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हैदराबाद गॅजेटमध्ये आहे. इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबाद गॅजेटमधील रेकॉर्ड चालेल, असा निर्णय आपण घेतला आहे. मात्र ज्याच्याकडे कुणबी नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यामुळे यातून ओबीसींचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काहीही झाले तरी ओबीसींचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. ओबीसींकरिता मंत्रालय, महाज्योती तयार करणारे, ओबीसीची महामंडळे सक्षम करणारे, तेरा वेगवेगळी महामंडळे तयार करणारे, ओबीसींकरिता परदेशी शिक्षण देणारे, ओबीसींकरिता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणारे, हे सरकार आहे, असे त्यांनी सांगितले.
ओबीसींचा विकास हेच शिवकार्य
छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणाऱ्या अठरापगड जातींना आम्ही मुख्य प्रवाहात आणणार नाही, तोपर्यंत शिवकार्य पूर्ण होणार नाही. ओबीसींचा विकास हेच शिवकार्य आहे, ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही. त्यामुळे कुणीही मनात शंका ठेवू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. इंग्रजांनी जे केले, ते आम्ही करणार नाही. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही. समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात, तुम्ही मागत राहा आणि आम्ही देत राहू. आमच्या सरकारची नीती पक्की आहे, एकाचे काढून असे दुसऱ्याला देणार नाही, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला.








