परगावाहून येणाऱ्यांची होणार गैरसोय : खासगी वाहनांचेही भाडेदर वाढणार
बेळगाव : बेळगावात सोमवार दि. 9 पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त शहर आणि परिसरातील बहुतांशी हॉटेल, लॉज आरक्षित झाले आहेत. त्यामुळे परगावाहून शहरात येणाऱ्या नागरिकांना काही कारणाने वसती रहावयाचे असल्यास हॉटेल, लॉजमध्ये जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. ग्रा. पं. विकास अधिकारी (पीडीओ) पदासाठी रविवारी बेळगाव शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा होती. परीक्षा सकाळच्या सत्रात असल्याने परगावाहून परीक्षेसाठी काही उमेदवार शनिवारी सायंकाळीच बेळगावात दाखल झाले होते. पण हॉटेल, लॉजमध्ये त्यांना वसतीसाठी खोलीच मिळाली नाही. गैरसोयीशी सामना करावा लागला. जिल्हा प्रशासनाने अधिवेशनाच्या निमित्ताने 2 हजाराहून अधिक खोल्या आरक्षित केल्या आहेत.
त्यामुळे परगावाहून येणाऱ्या नागरिकांना, परीक्षार्थींना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सोमवारपासून तब्बल दहा दिवस अधिवेशन चालणार असून 20 डिसेंबरनंतर आरक्षित खोल्या रिकाम्या होणार आहेत. तोवर परगावाहून येणाऱ्यांना शहर परिसरातील हॉटेल किंवा लॉजमध्ये खोली मिळणे दुरापास्तच आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने विविध जिल्ह्यातून विविध खात्याचे अधिकारी, आमदार, मंत्री, आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, केएएस अधिकारी, एफडीए, एसडीए, वाहनचालक, पोलीस कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी अशा सुमारे 11 हजार जणांचा समूह सोमवारपासून शहरात दाखल होणार आहे. त्यांच्या सोयीच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने आठवड्यापूर्वीच शहर आणि परिसरातील हॉटेल व लॉजमधील खोल्या आरक्षित केल्या आहेत.









