सोलापुरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला सुरुवात
सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार १० ऑक्टोबर रोजी सात रस्ता येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दुपारी एक वाजता अकरा पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षाच्या काळासाठी आरक्षण सोडत निश्चित करण्यात येणार आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढले असून या सोडतीच्या वेळी नागरिक व राजकीय प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक नियम १९६२ मधील नियम २ फ नुसार पंचायत समितीच्या सभापतींचे आरक्षण निश्चित करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षणाची सोडतही १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोलापुरात जिल्हास्तरावर तर पंचायत समिती गणाचे आरक्षण तहसील पातळीवर करण्यात येणार आहे.








