पंचायतराज खात्याकडून अध्यादेश जारी : बेळगाव जि.पं.साठी 91 तर ता.पं.साठी 304 मतदारसंघ
बेळगाव : राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकांची चर्चा रंगली असताना राज्यातील जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे या निवडणूका लोकसभा निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम असणार आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या जि.पं. व ता.पं. निवडणुका लवकरच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य सीमा निर्णय आयोगाकडून मतदारसंघ पुनर्रचना निश्चित केली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 91 जिल्हा पंचायत मतदारसंघात 46 मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात 304 तालुका पंचायत मतदारसंघापैकी 156 मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिलेल्या इच्छुकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्येही हालचाली गतिमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
पंचायत राज्य सीमा निर्णय आयोगाकडून राज्यातील 31 जिल्हा पंचायतींच्या 1126 सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. या संदर्भातील अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला होता. याला सरकारने अनुमोदन दिले आहे. यापैकी कोडगु जिल्हा वगळण्यात आला असून 30 जिल्ह्यांमधील जिल्हा पंचायतीच्या 1101 जागा निश्चित करुन अध्यादेश जारी करण्यात आला आहे. याबरोबरच राज्यातील 239 तालुका पंचायतींच्या 3671 पंचायत सदस्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याला सरकारने अनुमोदन दिले आहे. कोडगु जिल्हा वगळून 234 तालुका पंचायतींच्या 3621 ता.पं.सदस्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यासाठीचे आरक्षणही मतदारसंघानुसार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.
राज्यामध्ये सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूका घेण्यात आल्या आहेत. मात्र दोन वर्षांपूर्वी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत सभागृह विसर्जित करुन या निवडणूका घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचना करण्यावरुन हा विलंब झाला आहे. प्रकरण न्यायालयातही गेले होते. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला वारंवार मतदार संघ पुनर्रचना करण्यासंदर्भात सूचित केले होते. नुकताच पंचायत राज्य सीमा निर्णय आयोगाकडून मतदार संघ फेररचना करुन निश्चित केले आहेत. तर आरक्षणाबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार राज्य सरकारने सदर प्रस्ताव मान्य करुन अध्यादेश जारी केला आहे.
जिल्हा पंचायत 46 जागा महिलांसाठी राखीव
बेळगाव जिह्यात एकूण 91 जिल्हा पंचायतीच्या मतदारसंघातून 46 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. अनुसुचित जातीसाठी एकूण 12 जागा असून त्यातील 6 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अनुसुचित जमातीसाठी एकूण 7 जागा असून त्यातील 4 जागा महिलांसाठी, मागासवर्गीय अ गटासाठी 21 जागा असून त्यापैकी 11 जागा महिलांसाठी, मागासवर्गीय ब गटासाठी 5 जागा असून 2 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सामान्यासाठी 46 जागा असून त्यापैकी 23 सामान्य महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
15 तालुक्यांतील 156 मतदारसंघ महिलांसाठी राखीव
त्याचप्रमाणे बेळगाव जिह्यातील 15 तालुक्यातील एकूण 304 तालुका पंचायतीच्या मतदारसंघापैकी 156 मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. अनुसुचित जातीसाठी 53 मतदारसंघातून 21 महिलांसाठी, अनुसुचित जमातीसाठी 27 मतदारसंघ असून 19 महिलांसाठी, मागासवर्गीय अ वर्गासाठी 70 मतदारसंघ असून त्यापैकी 40 महिलांसाठी, मागासवर्गीय ब गटातून एकूण 14 जागा असून त्यापैकी 6 महिलांसाठी, सामान्य वर्गासाठी 156 मतदारसंघ असून सामान्य महिलांसाठी त्यातील 70 मतदारसंघ आरक्षित ठेवण्यात आले आहेत. निवडणूक विभागाने अखेर जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका घेण्यासाठी आता पुढाकार घेतला असून जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये या निवडणुका घेण्यात येण्याची शक्यता बळावली आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुका असून त्यापूर्वीच व विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांच्या पूर्वीच या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असल्याचे समजते. एकूणच ग्रामपंचायत निवडणूक निवडणुकीनंतर थोडीशी मरगळ आलेल्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीमुळे पुन्हा उत्साह संचारणार आहे. शिवाय जिल्हा, तालुका पंचायत निवडणुकीचे पडसाद आगामी लोकसभा निवडणुकीवरही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बेळगाव ता.पं.चे 10 मतदारसंघ घटले
बेळगाव तालुक्यातील मतदारसंघांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापूर्वी 45 तालुका पंचायत मतदारसंघ होते. ते आता कमी करण्यात आले असून 35 मतदारसंघ करण्यात आले आहेत. 10 मतदारसंघ घटविण्यात आले आहेत. तर अनेक मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. 35 तालुका पंचायत मतदारसंघामध्ये 18 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसुचित जातीसाठी 2 पैकी 1 महिला, अनुसुचित जमाती 4 पैकी 2 महिला, अवर्ग 9 पैकी 5 महिला, ब वर्ग 2 पैकी 1 महिला, सामान्य 18 पैकी 9 महिलांसाठी मतदार संघ आरक्षित करण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यातील 20 तालुका मतदार संघापैकी 10 मतदार संघ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसुचित जाती 2 पैकी 1 महिला, अनुसुचित जमाती 1 पैकी 1 महिला, अ वर्गा 6 पैकी 3 महिला, बवर्ग 1 पैकी 1, सामान्य 10 पैकी 4 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
जि.पं. मतदारसंघाचे आरक्षण (कंसात महिला)
- जागा 91 (46)
- एससी 12 (6)
- एसटी 7 (4)
- ओबीसी-अ 21 (11)
- ओबीसी-ब 5 (2)
- सामान्य 46 (23)
तालुका पंचायत मतदारसंघाचे आरक्षण (कंसात महिला)
- तालुका जागा एससी एसटी ओबीसी-अ ओबीसी-ब सामान्य
- बेळगाव 35 (18) 2 (1) 4 (2) 9 (5) 2 (1) 18 (9)
- खानापूर 20 (10) 2 (1) 1 (1) 6 (3) 1 (1) 10 (4)
- यरगट्टी 9 (5) 1 (1) 2 (1) 1 (1) 0 (0) 5(2)
- कागवाड 9 (5) 2 (1) 1 (1) 1 (1) 0 (0) 5(2)
- कित्तूर 9 (5) 1 (1) 1 (1) 2 (1) 0 (0) 5(2)
- मुडलगी 14 (7) 2 (1) 1 (1) 2 (2) 1 (0) 7(3)
- निपाणी 20 (10) 3 (2) 1 (1) 5 (3) 1 (0) 10(4)
- बैलहोंगल 22 (11) 1 (1) 3 (2) 6 (3) 1 (1) 11(4)
- रामदुर्ग 22 (11) 4 (2) 1 (1) 5 (3) 1 (0) 11(5)
- गोकाक 21 (11) 2 (1) 3 (2) 4 (2) 1 (1) 11(5)
- चिकोडी 22 (11) 3 (2) 1 (1) 6 (3) 1 (1) 11(5)
- रायबाग 23 (12) 4 (2) 1 (1) 5 (3) 1 (0) 12(6)
- सौंदत्ती 21 (11) 2 (1) 2 (1) 5 (3) 1 (0) 11(6)
- अथणी 28 (14) 4 (2) 1 (1) 7 (4) 2 (1) 14(6)
- हुक्केरी 29 (15) 4 (2) 4 (2) 5 (3) 1 (0) 15(8)









