एकूण 50 जागांपैकी महिलांना 18 जागा; एससी, एसटी, ओबीसींनाही पुरेसे आरक्षण
पणजी : राज्य निवडणूक आयोगाने उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी निवडणूक जाहीर केली असून दि. 13 डिसेंबर रोजी राज्यातील 50 जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी आरक्षण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या, अन्य मागासवर्गीय (ओबीसी) यांच्या संदर्भात उपलब्ध डेटा विचारात घेऊन, उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि महिला यांच्यासाठी राखीवता जाहीर केली आहे. आरक्षणाची अधिसूचना जारी झाल्यामुळे आता उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला गती मिळणार आहे. राज्यभरात यापूर्वीच इच्छुकांकडून तयारी सुरू झालेली असून त्यात भाजपशी संबंधितांचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले आहे. अधिसूचनेनुसार दोन्ही जिह्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 9 मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्या खालोखाल ओबीसी आणि एससी व एसटी मतदारसंघांचा समावेश आहे.
- उत्तर गोव्यात महिला राखीव मतदारसंघ : हरमल, मोरजी (ओबीसी), कोलवाळ, कळंगुट, रेईश मागूश, सांताक्रुज (ओबीसी), चिंबल, सेंट लॉरेन्स (ओबीसी) आणि मये.
- दक्षिण गोव्यात महिला राखीव मतदारसंघ : उसगांव गांजे, वेलिंग प्रियोळ, बोरी, शिरोडा, नावेली (ओबीसी), रिवण (एसटी), बार्से, खोला (ओबीसी), कुठ्ठाळी.
- उत्तर गोव्यात ओबीसी राखीव मतदारसंघ : मोरजी (महिला), तोरसे, हणजूण, सांताक्रुज (महिला), सेंट लॉरेन्स (महिला), पाळी, होंडा
- दक्षिण गोव्यात ओबीसी राखीव मतदारसंघ : कवळे, नुवे, दवर्ली, कुडतरी, नावेली (महिला) आणि खोला (महिला) यांचा समावेश आहे.
- एससीसाठी एक मतदारसंघ राखीव : संपूर्ण राज्यात उत्तर गोव्यातील केरी एकमेव मतदारसंघ राखीव
- 6 एसटीसाठी उत्तर गोव्यात ताळगाव हा एकमेव मतदारसंघ राखीव
- एसटीसाठी दक्षिण गोव्यात कुर्टी, राय, गिर्दोळी, रिवण (महिला), सावर्डे.
उत्तर गोव्यातील एकूण 25 मतदारसंघ
उत्तर गोव्यातील एकूण 25 मतदारसंघामध्ये हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे, शिवोली, कोलवाळ, हळदोणे, शिरसई, हणजूण, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, सांताक्रुज, ताळगाव, चिंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स, लाटंबार्से, कारापूर-सर्वण, मये, पाळी, होंडा, केरी आणि नगरगांव या मतदारसंघांचा समावेश आहे.
दक्षिण गोव्यातील एकूण 25 मतदारसंघ
दक्षिण गोव्यातील 25 मतदारसंघामध्ये उसगाव-गांजें, बेतकी-खांडोळा, कुर्टी, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बोरी, शिरोडा, राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, दवर्ली, गिर्दोळी, कुडतरी, नावेली, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, बार्से, खोला, पैंगीण, सांकवाळ आणि कुठ्ठाळी या मतदारसंघांचा समावेश आहे.









