रत्नागिरी :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट-गणांची प्रभाग रचना अंतिम टप्प्यात असताना राजकीय वर्तुळात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. नवीन रचनेत अनेक गावांचा गट आणि गण बदलल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे. सोमवारी 21 जुलै रोजी हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत संपेपर्यंत 9 पंचायत समित्यांमध्ये सुमारे 50 हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच रणधुमाळीला सुऊवात झाल्याचे चित्र आहे.
नव्या गट रचनेनुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेत एक गटाची तर दोन गणांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, गुहागर तालुक्यात एक गट आणि दोन गणांची वाढ प्रस्तावित आहे. यामुळे जिह्यात एकूण 56 गट आणि 112 गणांची निर्मिती होणार आहे. मात्र, याच गट-गण बदलामुळे काही गावे अन्य गट आणि गणांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या सर्व हरकतींवर लवकरच सुनावणी घेतली जाईल. सुनावणीनंतरचा अहवाल कोकण आयुक्तांकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर तो राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच रत्नागिरी जिह्यातील आगामी निवडणुकांचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मात्र, सद्यस्थितीत तरी गट-गण रचनेवरून सुरू झालेला हा वाद निवडणुकीतील रंगत आणखी वाढवणार आहे.
- सर्वाधिक हरकती संगमेश्वर तालुक्यात
जिह्यात सर्वाधिक हरकती संगमेश्वर तालुक्यात 21 इतक्या दाखल झाल्या आहेत. त्या खालोखाल राजापूरमध्ये 13 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. याशिवाय चिपळूण, लांजा आणि दापोलीमध्ये प्रत्येकी 1 हरकत, रत्नागिरीत 8 हरकती तर मंडणगडमध्ये 5 हरकती दाखल झाल्या आहेत. 21 जुलै रोजी हरकती दाखल करण्याची शेवटची तारीख होती. खेड आणि गुहागरमधून अजून माहिती जिल्हा शाखेकडे पोहोचलेली नसल्याचे सांगण्यात आले. पुढील 2 दिवसात जिह्यात एकूण किती हरकती दाखल झाल्या, हे स्पष्ट होणार आहे.








