राज्य महिला आयोग अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांना कानपिचक्या
बेळगाव : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी गणेशपूरजवळील ज्योतीनगरातील डोंबारी वसाहतीला भेट देऊन पाहणी केली. तेथील गैरसोयींबद्दल डॉ. नागलक्ष्मी यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक महिलांशी त्यांनी चर्चा केली. मंगळवारी डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी डोंबारी कॉलनी परिसरातील नागरी सुविधांची पाहणी केली. पायाभूत सुविधा पुरविण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. मुलांच्या शिक्षणासाठी कन्नड शाळा सुरू करावी, शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात यावे, बारावीनंतर शिक्षण घेणाऱ्या व शिक्षण अर्ध्यावर सोडलेल्या विद्यार्थ्यांची यादी देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. आरोग्य खात्याकडून नियमितपणे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या तपासण्या व्हाव्यात, सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ येथील नागरिकांना मिळावा, सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या परिसरात स्वत: भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेऊन काम करावे, असे सूचित केले. यावेळी समाजकल्याण खात्याचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळी, महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक नागराज यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.









