कोरोना व्हायरस चीनने जाणूनबुजून लोकांना संक्रमित करण्यासाठी तयार केल्याचा दावा
वृत्तसंस्था/ बीजिंग
कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात असताना चीनमधील एका संशोधकाने केलेल्या दाव्याने चीनचे पितळ उघडे पडले आहे. वुहानमधील एका संशोधकाने मोठा दावा करताना कोरोना व्हायरस चीनने जाणूनबुजून लोकांना संक्रमित करण्यासाठी तयार केल्याचे म्हटले आहे. त्याने चीनवर लोकांना संक्रमित केल्याचा आरोप केला आहे. तसेच ड्रॅगनने जाणूनबुजून कोविड-19 सारखे बायो-वेपन तयार केल्याचेही त्याने सांगितले. वुहानमधील संशोधक चाओ शाओ यांनी इंटरनॅशनल प्रेस असोसिएशनच्या सदस्य जेनिफर झेंग यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
कोविड-19 चीनमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता, असे म्हणणे यापूर्वीही जगभरातील वैज्ञानिकांनी मांडले होते. याची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे पथक वुहान लॅबमध्ये चाचणीसाठी गेले होते. मात्र, यासंबंधी चीनने अद्याप स्पष्ट कबुली दिलेली नाही. मात्र, संशोधकाच्या दाव्याने चीन तोंड घशी पडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाव्हायरस चीनने बायो-वेपन म्हणून तयार केले आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना विषाणूचे चार प्रकार देण्यात आले होते असेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच चाओ शाओ यांनी कोरोना विषाणूला जैवशस्त्र असे म्हटले असून वुहानमधील 2019 च्या मिलिटरी वर्ल्ड गेम्सदरम्यान त्यांचे अनेक सहकारी बेपत्ता झाल्याचाही मोठा दावा केला.









