दोडामार्ग पोलीस आणि ग्रामस्थांची पुन्हा एकदा जिगरबाज कामगिरी
दोडामार्ग – प्रतिनिधी
भेडशी पुलावरून वाहून जाणाऱ्यांना पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह दोडामार्ग पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामस्थांच्या मदतीने मशनु गंगाराम कांबळे , वय – 30 रा- चंदगड आणि ज्ञानेश्वर नागोजी हळवनकर, वय 25 वर्षे, रा -चंदगड या दोन बुडणाऱ्या तरुणांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी पाण्यात दोर टाकून सदरचा दोर कारला बांधून त्या दोरच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.याबरोबरच रात्रभर संततधार कोसळणाऱ्या पावसाने दोडामार्ग मधील अनेकांच्या घरात पाणी घुसले. पावसाचा जोर अजूनही सुरु आहे.
आज सकाळी साडेपाच वाजता भेडशी पुलावर पाणी आल्याचे तसेच सदर पुलावर दोन युवक कार मध्ये अडकून आहेत अशी खबर पोलिसांना मिळाल्यावर तात्काळ स्वतः पोलिस निरीक्षक सोबत, पोलीस हवालदार विठोबा सावंत, पोलीस हवालदार /सुतार, पोशी /अनिल कांबळे असे तत्काळ लाईफ जॅकेट, दोर, रिंग अशी साहित्य घेऊन घटनास्थळ भेडशी पूल येथे पोहोचले . सदर ठिकाणी एक कार व त्याच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेल्या स्थितीत दिसून येत होती. सदर कार मध्ये दोन युवक हे अडकून होते. पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग फार जास्त असल्या कारणामुळे भेडशी वरच्या पुलावरील रस्त्यावर पोलीस गेले . तेथे पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी धाडसाने स्वतः रिंग घेऊन पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी दोर बुडणाऱ्या तरुणांकडे फेकला त्यांनी तो दोर कारला बांधला.
त्यानंतर पोलीस हवालदार विठोबा सावंत, पो. नि निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस हवालदार सुतार, पोलीस हवालदार माळगावकर, पोलीस शिपाई अनिल कांबळे व ग्रामस्थ यांनी मिळून दोर टाकून सदरचा दोर कारला बांधून त्या दोरच्या साह्याने सदर दोन बुडत असणाऱ्या इसमांना साटेली – भेडशी ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.









