वार्ताहर /शिवोली
सडये शिवोली येथे एका विहीरीत पडलेल्या मांजराला वाचविण्यासाठी विहीरीत उतरलेल्या युवकाला म्हापसा अग्नीशामक दलाने वाचविण्याची घटना घडली. वाचविण्यात आलेल्या युवकाचे नाव कावीश साबरी (24) असून मूळ छत्तीसगड येथील रहिवासी आहे.
सडये येथे साबरी कुटुंबीय भाडेकरु म्हणून राहतात. दुपारच्या वेळेस साबरी कुटुंबीयांचे मांजर अंदाजे 30 फुट खोल विहीत पडले. त्याला वाचविण्यासाठी कावीश साबरी हा युवक पोहायला येत नसतानासुद्धा दोरी बांधून विहीरीत उतरला. कावीशने मांजराला कसेबसे वर काढले. पण कावीश विहीरी बाहेर येण्याच्या प्रयत्नात असताना दोरी तुटली व तो विहीरीत कोसळला. त्याला पोहता येत नव्हते पण विहीरीत असलेल्या दगडांना पकडून तो राहिला. या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला मिळताच ते घटनास्थळी पोहाचले व त्यांनी सिडी व विशेष बेल्टच्या सहाय्याने कावीश याला बाहेर काढले. प्रविण गावकर, जयेश कांदोळकर, विष्णू नाईक यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वाखाली कावीश याला बाहेर काढण्यात यश मिळविले.









