वायुदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य : 7 जवानांसह 21 जणांचा मृत्यू : 118 जण अद्याप बेपत्ता
वृत्तसंस्था/ गंगटोक
सिक्कीममध्ये 3 ऑक्टोबर रोजी ढगफुटीची घटना घडल्यावर तीस्ता नदीत आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या शुक्रवारी वाढून 21 झाली आहे. बुरदांग भागातून बेपत्ता झालेल्या सैन्याच्या 23 जवानांपैकी 7 जणांचे मृतदेह नदीच्या भागांमधून हस्तगत करण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री पी.एस. तमांग यांनी दिली आहे. बेपत्ता जवानांपैकी एकाला वाचविण्यास यश आले आहे. 15 जवानांसह एकूण 118 जण अद्याप बेपत्ता असून त्यांना शोधण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि वायुदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.

पुरामुळे अद्याप विविध भागांमध्ये 7 हजार लोक अडकून पडले आहेत. यातील लाचेन आणि लाचुंग भागात जवळपास 3 हजार लोक अडकून आहेत. 700-800 चालक देखील तेथे अडकून पडले आहेत. 3,150 जण दुचाकींवरून तेथे गेले होते ते देखील तेथेच आहेत, सैन्य आणि वायुदलाच्या हेलिकॉप्टर्सद्वारे या सर्वांना तेथून बाहेर काढले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव विजय भूषण यांनी दिली आहे. तर पूरसंकट पाहता शिक्षण विभागाने 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
10 सेकंदात 60 मीटर उंच धरण उद्ध्वस्त
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे सिक्कीममधील ल्होनक सरोवर तुटल्याचा संशय वैज्ञानिकांना आहे. अशात ढगफुटी झाल्याने सरोवराला पाणी रोखता आले नाही. यामुळे तीस्ता नदीत पूर आला आणि नदीची पातळी 15 ते 20 फुटांपर्यंत वाढली. नदीला लागून असलेल्या भागांमध्ये सैन्याचे शिबिर होते, जे पूरात वाहून गेले आणि तेथे उभी 41 वाहने पाण्यात बुडाली. केवळ 10 सेकंदांमध्ये 13 हजार कोटी रुपयांच्या तीस्ता-3 जलविद्युत प्रकल्पाचे 60 मीटर उंच धरण ल्होनक सरोवरातून आलेल्या पुरामुळे पूर्णपणे वाहून गेले आहे. सिक्कीममध्ये दक्षिण सरोवर भविष्यात फूटू शकते आणि सखल क्षेत्राला उद्ध्वस्त करू शकते असा इशारा संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने दोन वर्षांपूर्वी दिला होता.
पश्चिम बंगालमध्ये विस्फोट, 2 ठार
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात कथितपणे तीस्ता नदीच्या पुराच्या पाण्यातून वाहून आलेला मोर्टारच्या एका गोळ्याचा विस्फोट झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. हा मोर्टार शेल सैन्याचा होता, जो सिक्कीममधील पुराच्या पाण्यासोबत वाहून पोहोचला होता. एका इसमाने हा मोर्टार शेल स्वत:च्या घरी नेत तो फोडण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान त्यात विस्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी एक मार्गदर्शक सूचना जरी करत लोकांना नदीत वाहून येणाऱ्या कुठल्याही सामग्रीपासून दूर राहण्यास सांगितले आहे. सिक्कीम सरकारने देखील अशाच प्रकारचा इशारा जारी केला आहे. तीस्ता नदीच्या पाण्यात स्फोटके अन् दारूगोळा असू शकतो असे म्हणत राज्य सरकारने लोकांना सतर्क केले आहे.
सिक्कीमच्या 4 जिल्ह्यांना फटका

सिक्कीमधील मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामची या 4 जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे 22 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. तर 2 हजारांहून अधिक जणांना वाचविण्यात आले आहे. या 4 जिल्ह्यांमध्ये 26 मदत शिबिरांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तेथील पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन, सीवेज लाइन, आणि 250 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर 11 पूल वाहून गेले आहेत.
एनएच-10 वाहून गेला
सिक्कीममधील शेकडो गावांचा मुख्य मार्गांशी संपर्क तुटला आहे. दिखचू, सिंगतम आणि रांगपो शहर पाण्याखाली गेले असून पुरामुळे सिक्कीमला देशाशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग-10 देखील वाहून गेला आहे. राज्य सरकारने या घटनेला आपत्ती घोषित पेल आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमची स्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याशी संपर्क साधत त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.









