पुणे / प्रतिनिधी :
लोणावळय़ात राजमाची परिसरातील ढाक भैरीच्या डोंगरावर ट्रेकिंगदरम्यान भरकटलेल्या चार विद्यार्थ्यांची शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थांचे स्वयंसेवक, कामशेत पोलीस व कोंडेश्वर ग्रामस्थ यांनी सुखरूप सुटका केली. काळाकुट्ट अंधार, त्यात धो धो कोसळणारा पाऊस आणि दाट धुके अशा तिहेरी संकटातही बचाव पथकाने अनोखी जिद्द दाखवित या तरुणांचा शोध घेण्यात यश दाखविले.
चेतन कबाडे, सुमीत शेंडे, अमोल मोरे, आदित्य सांगळे अशी सुटका केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सिंहगड टेक्निकल इन्स्टिटय़ूट, वडगाव येथे शिक्षण घेत असलेले चौघे मंगळवारी ढाक भैरीच्या डोंगरावर टेकिंगसाठी गेले होते. कोंडेश्वरमार्गे ढाक भैरीवर त्यांनी चढाई केली. गड चढत असतानाच चौघेही रस्ता चुकले. परतीचा मार्ग त्यांच्या लक्षात येईना. आपण चुकलोय हे समजताच त्यांनी अनेकांना मदतीसाठी फोन केले. दरम्यान, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपला मित्र मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, कामशेत पोलीस आणि कोंडेश्वर ग्रामस्थ यांनी या मुलांना शोधण्याची मोहीम सुरू केली. मंगळवारी रात्री नऊ वाजता शोध मोहीम सुरू झाली. चार तास अथक शोध घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास रस्ता चुकलेले चौघे कुसुर पठाराजवळ आढळले. बचाव पथकातील स्वयंसेवकांनी चारही मुलांना प्यायला पाणी दिले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यानंतर सर्वजण गड उतरले.
शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सुनील गायकवाड, महेश म्हसणे, योगेश उंबरे, रतन सिंग, हर्ष तोंडे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष गणेश निसाळ, गणेश ढोरे, विनय सावंत, सत्यम सावंत, शुभम काकडे, कमल परदेशी, जीगर सोलंकी, विकी दौडकर, साहील नायर व पोलीस पाटील यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला.