अपहरणकर्ते कार सोडून पळाले : संदीपसह फोंडा पोलिस गोव्याकडे
फोंडा : मंगळवारी भर दुपारी ज्योफिलनगर-फोंडा येथील कार्यालयातून बाहेर पडताना अज्ञातांनी अपहरण केलेल्या संदीप छत्रलाल चौधरी या युवा उद्योजकाला सुखरुपरित्या परत गोव्यात आणण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. काल बुधवारी रात्री उशिरा बेंगळुरु येथे केलेल्या कारवाईच्यावेळी अपहरणकर्ते तिघेजण कार व संदीप याला एका ठिकाणी सोडून पळाल्याने पोलिसांना हे यश आले. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप चौधरी याचा भंगाराच्या मालाची उकल करण्याचा व्यवसाय आहे. कुंडई, बेतोडा, उसगांव, मडकई या औद्योगिक वसाहतीतून भंगाराची उकल करण्याचा व्यवसाय तो करीत आहे.
या व्यवसायातील दुश्मनीमुळेच हे अपहरण झाले, असा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. या अपहरणाचा छडा लावण्यासाठी फोंडा पोलिसांच्या दोन तुकड्या बेळगाव, बेंगळुरु येथे रवाना झाल्या होत्या. बुधवारी रात्री उशिरा फोंडा पोलिस अपहरणकर्त्याच्या वाहनाचा पाठलाग करत बेंगळुरुला पोहोचले. आपण पोलिसांच्या तावडीत सापडणार म्हणून अपहरणकर्त्यांनी कार तसेच संदीप चौधरी याला तसेच सोडून देऊन पळ काढला. गोवा पोलिस संदीपला घेऊन गोव्याकडे यायला निघाले आहेत. या कारवाईत फोंडा पोलिसांना कर्नाटक पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले.आपल्याला बेशुद्ध करुन नेण्यात आले होते, असे संदीपने पोलिसांना सांगितले आहे.









