कोल्हापूर :
राजारामपुरी येथील दौलतनगर परिसरातील एका घरामध्ये मनोरुग्ण महिलेस साखळदंडाने अमानुषपणे बांधून घातल्याचे धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. घराच्या तळमजल्यावर वेल्डीमशीनला साखळी बांधून त्या महिलेस खुर्चीवर बसवून तिच्या हातामध्ये आणी गळ्यात तीन कुलुपे घालण्यात आली होती. सुरेखा हणमंत साळी (वय 40 रा. दौलतनगर, पाथरुट वसाहत) या महिलेची स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि राजारामपुरी पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी भाउ सुर्यकांत हणमंतराव साळी, भावजय रुपा साळी यांच्यासह अल्पवयीन तरुणावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दौलतनगरातील महिलेल्या साखळदंडात बांधल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली. यानंतर या दोघांच्या संयुक्त पथकांने पाथरवट वसाहतीत गेले. पोलिस वाहने अचानकपणे वसाहतीत आल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घरात शिरून त्या महिलेची सुटका करून तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.
सुरेखा यांना सांभाळणारा भाऊ, भावजय व त्यांच्या मुली सध्या बाहेरगावी गेले आहेत. भाचा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असून तो घरात होता. पोलिसांना साळी यांच्या घरातून या महिलेची सुटका केली. यानंतर याची माहिती तिच्या भावाला देऊन तातडीने पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले.
- अल्पवयीन तरुणाला मारहाण
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार व त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्या अल्पवयीन तरुणास पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस स्टेशनला घेवून जात होते. याचवेळी संजय पवार व त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी त्या तरुणास कानशिलात लगावत मारहाण केली. पोलिसांनी तात्काळ त्या तरुणास बाजूला घेत वाहनातुन राजारामपुरी पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
- तीन कुलुपांनी बांधून घातले
सुरेखा साळी यांना त्यांच्या नातेवाईकांनी वेल्डींग मशीनला बांधून एका खुर्चीवर बसविले होते. त्यांच्या पायामध्ये हातामध्ये आणि गळयात लोखंडी साखळी बांधली होती. हातामध्ये पायात आणि गळ्यामध्ये अशी तीन कुलपे लावण्यात आली होती. लोखंडी तीन साखळ्या एकमेकांना कुलुपांच्या सहाय्याने बांधण्यात आल्या होत्या.
- दोन कुलपे निघाली, तिसऱ्यासाठी डुप्लीकेट चावी
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून महिलेची सुटका केली. यावेळी दोन कुलुपांच्या किल्ल्यां घरामधील फ्रिजवर ठेवलेलेल्या पोलिसांना मिळाल्या. यामुळे दोन कुलुपे निघाली, मात्र गळ्याजवळ बांधलेले तिसरे कुलूप मात्र पोलिसांना निघेना. त्याची किल्लीही पोलिसांना मिळाली नाही. अखेर डुप्लीकेट चावी करणाऱ्यास घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. यानंतर चावी बनवून सारीका साळी यांची सुटका करण्यात आली.
- त्यांची काही चुक नाही
लहानपणीच सुरेखा साळी यांना पोलिओ झाल्याने एका पायाने अपंगत्व आले. पण भावाने सुरेखा यांना बी. कॉम पर्यंत शिकवले. हे शिक्षणही इंग्रजी माध्यमातून घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, काही वर्षांपासून तिची मानसिक स्थिती बिघडत गेली. रात्रीच्या वेळेस ती अचानकपणे वाहने अडवून दगडफेक करायची, अनेकदा रस्त्यावरून जाणाऱ्यांचा चावा घेतल्याचेही प्रकार घडले होते. यामुळे घरचे तिला बांधून घालत होते असे गल्लीतील महिलांनी सांगितले. सारीका साळी यांना साखळीने बांधून घातल्याची घटना दुर्देवी आहे. म्हणूनच साळी कुटूंबियांनी सुरेखाला बांधून ठेवले असेल असे परिसरातील नागरीकांनी सांगितले. साळी कुटूंबावर कारवाई करु नका असे निवेदनही परिसरातील नागरीकांनी राजारामपुरी पोलिसांना दिले.
- वर्दीतील माणूसकी
सारीका साळी या दोनही पायाने अपंग असल्यामुळे त्यांना स्ट्रेचरवरुन अॅम्बुलन्स पर्यंत नेवून त्यानंतर त्यांना सिपीआर रुग्णालयात नेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र मुख्य रस्त्यापासून साळी यांचे घर आतल्या बाजूस असल्यामुळे तेथे स्ट्रेचर नेणे शक्य नव्हते. यामुळे पोलीस कॉन्स्टेबल श्रुती कांबळे, पोलीस नाईक सारीका गौतम यांनी सारीका साळी यांना हातामध्ये उचलून अॅब्युलन्सपर्यंत नेले. यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपंग महिलेस बांधून टेवले होते. साखळदंडास तीन कुलुपे होती. का बांधून ठेवले, कशासाठी बांधून ठेवले याची माहिती घेत आहोत. दोन महिन्यापासून या महिलेस बांधून ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर
साखळदंडातून सोडवून सारीका साळी यांना सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. साळी यांचे भाउ आणि भावजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण








