टिळकवाडी येथील घटना : अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न
बेळगाव : पतंगाच्या मांजात तीन तासाहून अधिककाळ पक्षी अडकल्याची घटना मंगळवारी सकाळी टिळकवाडी येथे घडली. अग्निशमन जवानांनी अथक परिश्रमाने नारळाच्या झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या पक्ष्याची अखेर सुटका केली. परंतु मांजामुळे मनुष्यासह प्राण्यांनाही इजा पोहचत असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
स्वामी विवेकानंद कॉलनी टिळकवाडी येथे एका नारळाच्या झाडावर कावळा मांजामध्ये अडकून ओरडत असल्याचे आजूबाजूंच्या लक्षात आले. यानंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन जवानांना या घटनेची माहिती दिली. अग्निशमन जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून शिडीच्या साहाय्याने कावळ्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पायाला मांजाने घट्ट वेढा घातल्यामुळे कावळ्याची सुटका होत नव्हती.
अखेर काठीच्या साहाय्याने मांजा कापून कावळ्याची सुटका करण्यात आली. अग्निशमन विभागाचे ठाणाधिकारी शिवाजी कोरवी यांच्या नेतृत्त्वाखाली मोहीम राबविण्यात आली. आठ दिवसांपूर्वी वडगाव-शहापूर रस्त्यावर एका चिमुकलीला पतंगाच्या मांजामुळे गंभीर दुखापत झाली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.









