लष्कराकडून मदतकार्य : चुंगथांग खोऱ्यात भूस्खलन, मुसळधार पाऊस
► वृत्तसंस्था / गंगटोक
उत्तर सिक्कीममधील चुंगथांग येथे भूस्खलन आणि पावसामुळे रस्ता वाहून गेल्यामुळे तेथे अडकलेल्या सुमारे 3,500 पर्यटकांची भारतीय लष्कराने सुटका केली. यामध्ये काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. शुक्रवारी लाचेन, लाचुंग आणि चुंगथांग खोऱ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर रस्ता संपर्क यंत्रणा तुटल्यामुळे अनेक पर्यटक अडकले होते. पर्यटकांना वाचवण्यासाठी घटनास्थळी तात्पुरत्या स्वरुपात रस्तामार्ग पूर्ववत करण्यात आला. तात्पुरती क्रॉसिंग यंत्रणा बांधण्यासाठी लष्करी जवानांनी रात्रभर काम केले. तसेच पर्यटकांना आश्रय देण्यासाठी परिसरात तंबू उभारण्यात आले. तसेच वैद्यकीय मदतीसाठी चौक्मया तयार करण्यात आल्या होत्या. अजूनही काही भागात अडथळे कायम असून पर्यटकांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी मार्ग मोकळा होईपर्यंत सर्वतोपरी मदत केली जात आहे.
सिंगताम, डिक्चू, रंगरान, मंगन आणि चुंगथांग यांना जोडणाऱ्या रस्त्याला भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. डिक्चू ते गंगटोक मार्गे राकडुंग-टिनटेक मार्ग फक्त हलक्मया वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या माहितीसाठी स्थानिक प्रशासनाने 8509822997 हा हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.









