इराण्णा कडाडी यांचा पुढाकार : उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधियांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळ हे देशातील एक जुने विमानतळ म्हणून ओळखले जाते. हा हवाई दलाचा प्रशिक्षण विभाग असल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथून देशातील 13 शहरांना ‘उडाण’अंतर्गत विमानसेवा उपलब्ध होत्या. परंतु, सध्या मात्र यातील बऱ्याचशा सेवा बंद पडल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून बंद झालेल्या सेवा पुन्हा सुरू करत नव्या मार्गांवर विमानफेऱ्या मंजूर करून द्याव्यात, अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बुधवारी संसदेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत त्यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार मंगला अंगडी व खासदार आण्णासाहेब जोल्ले उपस्थित होते. आपण यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विमान कंपन्यांशीही बोलणी करू, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
कोरोनापूर्वीपर्यंत इंडिगो, स्पाईस जेट, अलायन्स एअर, स्टार एअर, ट्रू जेट या पाच विमान कंपन्या देशातील महत्त्वाच्या 13 शहरांना सेवा देत होत्या. परंतु, 28 ऑक्टोबरपासून अलायन्स एअरने बेळगाव-पुणे विमानसेवा बंद केली. त्यानंतर स्पाईस जेट कंपनीने दिल्ली, हैदराबाद, मुंबई या सेवा रद्द केल्या. तर ट्रू जेट कंपनीने बेळगावमधील सर्वच सेवा यापूर्वीच गुंडाळल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद असतानाही विमानफेऱ्या का बंद केल्या जात आहेत? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.
मंगळवारी बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनतर्फे मुंबई व दिल्ली या शहरांना दररोज विमानसेवा सुरू करण्याची मागणी कडाडी यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेत कडाडी यांनी बुधवारी संसदेत केंद्रीयमंत्री सिंधिया यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर बेळगावची समस्या मांडली.









