जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेळगाव : दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. हुक्केरी येथे त्यानी ही माहिती दिली. कोयना जलाशयातून पाणी सोडण्यासाठी यापूर्वीच महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रातून पाणी सोडण्याचा आपल्याला विश्वास आहे. कृष्णा नदीमध्ये अद्याप दहा दिवस पुरेल इतके पाणी आहे. हिडकल डॅममधून पाणी सोडले जाईल. इतक्यात महाराष्ट्रातून पाणी सोडल्यास अधिक सोयीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. हुबळी येथे अंजली हिच्या खुनावरून भाजप नेत्यांकडून आंदोलन केले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, भाजप नेते अशा प्रकरणांचा राजकारणासाठी उपयोग करून घेत आहेत. निवडणुका असतील तर आंदोलन करत आहेत. न्याय देण्यासाठी त्यांचे आंदोलन नाही, असा आरोपही त्यांनी केला.बेळगाव जिल्ह्यातील 2 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई देण्यात आली आहे. केंद्राकडून अद्याप निधी येणे बाकी आहे. सदर निधी आल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.









