राज्यस्तरीय सोहळा ताळगाव पठारावर प्रत्येक तालुका स्तरावरही ध्वजारोहण
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात आज गुरुवारी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 8.45 वाजता ताळगांव पठारावरील गोवा विद्यापीठाच्या मैदानावर हा सोहळा होणार आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यावेळी राष्ट्रीय तिरंगा फडकावून मानवंदना देतील. त्यानंतर गोव्याच्या जनतेला उद्देशून भाषण करतील.
कार्यक्रमाच्या ठिकाणी राज्यपालांचे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव पुनीत गोयल, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, गोवा विभागाचे ध्वजाधिकारी त्यांचे स्वागत करतील.
प्रजासत्ताक दिन सोहळ्यास मंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अॅडव्होकेट जनरल आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी विविध शाळांतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवरही प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मडगाव जिल्हास्तरीय सोहळ्यात सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल राष्ट्रीय तिरंगा फडकावतील तर फोंडा येथे कृषिमंत्री रवी नाईक, म्हापसा येथे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वास्को येथे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, काणकोण येथे सभापती रमेश तवडकर, केपे येथे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पेडणे येथे मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, वाळपई येथे आमदार डॉ. देविया राणे, सांगे येथे समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, धारबांदोडा येथे क्रीडामंत्री गोविंद गावडे, डिचोली आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो तिरंगा फडकवतील.
मुख्यमंत्र्यांकडून प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रजासत्ताक दिन’ हा स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय भावना आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. जेव्हा संविधान सभागृहाने भारतीय संविधानाचा स्वीकार केला, त्या आनंदाचा आणि उत्साहाचा हा दिवस आपल्या समाजातील प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे रक्षण करील. देशाने आतापर्यंत आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती केली असून आजच्या या आनंदाच्या प्रसंगी आम्ही आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा निर्माण करण्याचा संकल्प करूया, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले.









