बेळगाव : अरिहंत हॉस्पिटलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोगतज्ञ डॉ. सुरेश पट्टेद उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. एम. डी. दीक्षित होते. यावेळी डॉ. पट्टेद म्हणाले, अरिहंत हॉस्पिटल उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व गोवा येथील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देत असून नवीन माणके प्रस्थापित करत आहे. डॉ. एम. डी. दीक्षित यांनी हॉस्पिटलचा प्रवास व त्याची उद्दिष्टे सांगितली. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उपचार करतानाच सर्वांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक अभिनंदन पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. सूरज पाटील, डॉ. संजीव आर. टी., डॉ. अमित मुंगरवाडी, डॉ. प्रतीक, डॉ. गणेश, डॉ. अंबरीश नेर्लीकर उपस्थित होते.
एसबीजी आयुर्वेदिक कॉलेजतर्फे 
गणेशपूर येथील एसबीजी आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पवनकुमार शर्मा उपस्थित होते. यावेळी प्राचार्य अडिवेश अरकेरी, डॉक्टर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
राजहंसगड किल्ला
श्री सिद्धेश्वर देवस्थान किल्ला सुधारणा कमिटी, राजहंसगड यांच्यावतीने राजहंसगड किल्ल्यावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात पूजाअर्चा करून गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केल्यानंतर ध्वजस्तंभासमोरील भारतमातेला वंदन करण्यात आले. ग्राम पंचायत तलाठ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी इलेक्ट्रीक ध्वजस्तंभावर ध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा केला. याप्रसंगी ग्राम पंचायत लेखपाल, किल्ला सुधारणा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुभाषचंद्रनगर नागरिक संघटना
सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेच्यावतीने आझाद बागेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. उपाध्यक्ष राजेश तेंडुलकर यांनी स्वागत, चंद्रशेखर इट्टी यांनी पाहुणे शीला व दिलीप हंगिरगेकर यांना सन्मानित केले. हंगिरगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंगीराम जांगरा यांनी मिठाई वाटली तर अनंत सावंत यांनी चहा व नाष्ट्याची व्यवस्था केली. संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. विद्या ईट्टी यांनी सूत्रसंचालन केले.
कन्नड सांस्कृतिक भवन
प्रजासत्ताक दिनानिमित्त नेहरूनगर येथील कन्नड सांस्कृतिक भवनवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बी. एस. गवीमठ, सुभाष एनगी, बसवराज गार्गी, सचिव य. रू. पाटील, एम. वाय. मेणसीनकाई आदी उपस्थित होते.
शिवशक्ती युवक मंडळ
शिवशक्ती युवक मंडळ यांच्यावतीने 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे माजी सैनिक रोशन शेटवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. अशोक कोरवी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशन
बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे मुद्रा भवन येथे 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. उपाध्यक्ष संतोष होर्तीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. माजी अध्यक्ष बापू जाधव यांनी स्वागत केले. शिवा ऑफसेटचे संचालक शिवु नंदगावी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक सतीश जाधव, नंदू देशपांडे, शाम मांगले यांच्यासह सभासद उपस्थित होते. सचिव रघुनाथ राणे यांनी आभार मानले.










