प्रत्येकजण सुसंस्कृत-सुशिक्षित होण्यासाठी ‘तरुण भारत’चे योगदान : डॉ. किरण ठाकुर : हिंडलगा येथे सुरक्षारक्षकांचे शानदार पथसंचलन
बेळगाव : ‘तरुण भारत’च्या हिंडलगा येथील कॉर्पोरेट कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यकारी संचालक रोमा ठाकुर यांच्या संकल्पनेनुसार ‘तरुण भारत’मधील विविध विभागात काम करणाऱ्या एका व्यक्तीला ध्वजारोहणाचा मान दिला जातो. यंदा हा मान रिपोर्टिंग विभागातील सुशांत कुरंगी यांना मिळाला. त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर, रोमा ठाकुर व परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. सुशांत कुरंगी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत झाले. यानंतर ‘तरुण भारत’च्या सुरक्षारक्षकांनी शानदार पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते सुशांत कुरंगी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. किरण ठाकुर म्हणाले, आज आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. लोकसंख्येने जगात मोठा असलेला आपला देश असून येथे खऱ्या अर्थाने लोकशाही नांदत आहे. लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालविलेले राज्य ही लोकशाहीची संकल्पना आहे. त्यादृष्टीने आपण प्रगल्भ झाले पाहिजे. प्रत्येकजण सुसंस्कृत व सुशिक्षित व्हावा, यादृष्टीने ‘तरुण भारत’ नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. अन्यायाविरुद्ध झुंज व लोकशिक्षण हे ब्रिद समोर ठेवून आपण आजपर्यंत वाटचाल केली, तीच वाटचाल कायम ठेवूया. हजारो लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या सर्वांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे. म्हणूनच त्याचे महत्त्व व मोल अधिक आहे. प्रारंभी सीएमओ उदय खाडिलकर यांनी स्वागत केले. मनीषा सुभेदार यांनी आभार मानले. यावेळी संपादक विजय पाटील, व्यवस्थापक गिरीधर शंकर व विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.









