ईडीकडून 7 ठिकाणी छाप्यांची कारवाई ः
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी सकाळी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले आहेत. सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद असून 9 जूनपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. 57 वर्षीय जैन यांना 30 मे रोजी अटक करण्यात आली होती.
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी जैन, त्यांची पत्नी पूनम जैन आणि इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जैन यांनी कथितपणे दिल्लीत अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या किंवा खरेदी केल्या होत्या. कोलकात्यातील तीन हवाला ऑपरेटर्सद्वारे 54 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 16.39 कोटी रुपयांचा काळा पैसा हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
सत्येंद्र जैन यांना ईडीने ऑगस्ट 2017 मध्ये सीबीआयकडून नोंद मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्हय़ांतर्गत अटक केली आहे. मागील महिन्यात ईडीने जैन कुटुंब आणि त्यांच्याशी निगडित कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता गोठविली होती. 2018 मध्ये देखील याप्रकरणी ईडीने जैन यांची चौकशी केली होती.
ईडीला तपासात सहकार्य करत नसल्यानेच जैन यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सत्येंद्र जैन यांना अटक झाल्याने त्यांच्याकडील विभागांचा प्रभार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.









