रत्नागिरी :
जिंदल कंपनीच्या नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी येथील शेती, बागायती, जैवविविधता आणि सामान्य लोकांच्या अस्तित्वावर घाला येत असेल तर ही जनता ८ दिवसात आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरायला कमी पडणार नाही. म्हणून जिंदल कंपनीच्या गॅस कंपनीचे काम जनसुनावणीच्या आवश्यक प्रक्रिया टाळून करण्यात आले आहे. त्याविषयी चर्चा करण्याकरीता कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही तसेच कंपनीचे गॅस टर्मिनल अन्य सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी करणारे निवेदन प्रदूषणविरोधी कृती समिती नांदिवडे, ता. रत्नागिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना
या संदर्भातील एक निवेदन समितीमार्फत सादर केले आहे.
त्याची प्रत उपिवभागी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे. या निवेदनात नमूद आहे की, १२ डिसेंबर २०२४ रोजी नांदिवडे येथे जेएसडब्ल्यू कंपनी परिसरात वायूगळतीची घटना घडली. नजीकच लोकवस्ती असून कंपनी परिसरात राखेचा समितीचे त्रास लोकांना होत आहे. त्याचबरोबर नांदिवडे परिसरातील अनेक विहीरींचे पाणी राखमय झाले आहे. या परिसरात कॅन्सर पेशंट सापडत आहेत, अनेक लोकांना त्वचेच्या आजारांची लागण झाली आहे. पुढे म्हटले आहे की, कंपनीकडून नेहमी सांगितले जाते की, कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही सदैव जागरुक आहोत. मात्र प्रत्यक्षात वायू गळतीसारख्या घटना होत आहेत. सीआरझेड कायद्याप्रमाणे प्रकल्पांचा अभ्यास व सार्वजनिक सुनावणी घेणे आवश्यक आहे. कंपनीच्या प्रक्रियेत अपारदर्शकता राहिली आहे. स्थानिकांच्या हरकतींचा विचार केलेला नाही. कंपनीच्या प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन बैठक घ्यावी यालाही प्रतिसाद मिळत नाही. कंपनीचे गॅस टर्मिनल अन्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी जीवन देसाई यांना सादर करण्यात आले.








