बेळगाव : राज्यातील ग्रंथपालांचे वेळेवर वेतन होत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील 48 पर्यवेक्षकांचेही किमान वेतनातील फरक व वेतनही अद्याप करण्यात आलेले नाही. दरम्यान, कलबुर्गी जिल्ह्यातील मळखेड ग्रामपंचायतीच्या महिला ग्रंथपालाने वेळेवर वेतन होत नसल्याच्या कारणाने ग्रंथालयात आत्महत्या केली. वेळेवर वेतन देत नसल्याच्या मानसिकतेतूनच सदर ग्रंथपालाने असे मोठे पाऊल उचलले. आता तरी राज्य सरकारने ग्रंथालय संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर करावे. आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्राम. पंचायत ग्रंथालय, ग्रंथपाल व माहिती साहाय्यक संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी जि. पं. सीईओंची भेट घेऊन वेतन देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र अद्यापही कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांचे जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्याचे 12 हजाराचे वेतन योग्यरित्या देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर सप्टेंबर 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षकांच्या वेतनात फरक करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले असून, उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेतन देण्यात यावे. त्याचबरोबर आत्महत्या केलेल्या ग्रंथपालाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देऊन त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीदेखील देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.









