सलग दोन दिवसात घडलेल्या दोन दुर्घटनांनी महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पहिली दुर्घटना जुन्या मुंबई रस्त्यावर चालकाने चुकीच्या मार्गाने घेऊन गेलेली बस दरीत कोसळल्याने झांज पथकातील 13 जणांना आपले जीव गमवावे लागले. शनिवारच्या भल्या सकाळी घडलेल्या या दुर्घटनेने महाराष्ट्र हळहळला. त्याला 24 तास होईपर्यंत नवी मुंबईच्या खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या सोहळ्यात दुर्घटना घडली. हा सोहळा भर उन्हात पार पाडल्याने त्यांच्या असंख्य भक्तांना उष्माघाताचा त्रास होऊन 13 जणांना जीव गमवावा लागला. सरकारने दोन्ही दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली असली तरी, कोटी मोलाचा जीव हकनाक गमावल्यानंतर अशा सोपस्काराला फारसा अर्थ उरत नाही. झांज पथक वाहनाच्या चालकाला माहीत होते की, लवकर पोहोचण्याच्या नादात आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहोत. मात्र तरीही त्याने तो धोका पत्करला आणि नेमक्या अपघाताच्या वळणावर त्याची गाडी दरीत कोसळली. त्याच्या एका चुकीमुळे 13 जणांना देहदंड तर झालाच पण, जिवंत प्रवाशांनाही आयुष्यभर यातना सोसाव्या लागणार आहेत. लहान बालके, अंगावर कुटुंबाची जबाबदारी असणारे तगडे युवक या अपघातात हकनाक बळी गेले. मृत्यू पत्करण्याचे त्यांचे वय नव्हते आणि त्यांची तशी प्रकृतीही नव्हती. मात्र तरीही त्यांच्या जगण्याचा हक्क एका चुकीने नाकारला गेला. नातेवाईकांचा टाहो-आक्रोश हृदय पिळवटणारा होता. महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी हतबलपणे हे सर्व भल्या सकाळी पाहत होता. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याच्या बाबतीतही नेमके हेच घडले. धर्माधिकारी परिवाराचे कार्य मोठे आहे. त्यांनी आपल्या परीने समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लाखोंचा समुदाय त्यांचा अनुयायी आहे. हा समुदाय त्यांच्या स्वच्छतेसह प्रत्येक कार्यक्रमात आघाडीवर असतो. त्यामुळेच या कुटुंबात महाराष्ट्र भूषण दिला जातोय म्हटल्यानंतर गर्दी अपेक्षितच. सरकारने या गर्दीचा फायदा आपली प्रसिद्धी होण्यासाठी केला असा आरोप आता होतोय. राज्य सरकारने या सोहळ्यावर जो खर्च केला आहे त्यातून या समारंभामागील हेतू स्पष्टपणे दिसतो. फायर ब्रिगेडच्या गाड्यांपासून साप पकडणाऱ्या माणसांपर्यंत सर्वांची नेमणूक केली होती असे आता सांगितले जात आहे. पण, महाराष्ट्र सरकारच्याच आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचावण्यासाठी भर उन्हात बाहेर जाणे टाळावे, शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होऊ देऊ नये आणि घामावाटे कमी होणारे शरीरातील पाणी स्थिर राहावे यासाठी थोड्या, थोड्या अंतराने पाणी प्राशन करण्याचा दिलेला सल्ला खुद्द महाराष्ट्र सरकारच विसरले असे म्हणावे लागेल. भर दुपारी बाराच्या उन्हात लोक खुल्या मैदानावर डोक्यावर कोणतेही छत नसताना बसून होते. कार्यक्रमाचे किमान दोन तास आणि त्यापूर्वी मैदान भरेपर्यंत बसून राहिल्याने अनेक लोकांना उष्माघाताचा त्रास होणे स्वाभाविक होते. त्यापासून बचावासाठी प्रत्येकास पिण्याच्या पाण्याची, डोक्यावर टोपी किंवा छताची व शरीराचे तापमान वाढू नये यासाठी सामान्य उपाय करायला लावण्याची आवश्यकता होती. सरकारने या समारंभावर किती खर्च केला? जाहीर नाही. मात्र शासनाच्या एका खात्याने दुसऱ्याला आपले बजेट सादर करताना साडे तेरा कोटी रुपयांची मागणी केली होती हे लक्षात घेतले तर उष्माघाताने त्रास होऊन मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जागेवरच चांगल्या पद्धतीच्या सुविधा देणे सरकारला फार काही अवघड होते असे नाही. त्यासाठी सामान्य पद्धतीच्या औषध, गोळ्यांचाही वापर केला जाऊ शकतो आणि व्यक्तीच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहील याचीही खबरदारी घेता येऊ शकते. या समारंभासाठी येणारे लोक सर्व वयोगटाचे असतील आणि त्यात रक्तदाब, हृदयरोगापासून विविध प्रकारच्या व्याधींनी त्रस्त असलेले लोकसुद्धा असतील हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे होते. वास्तविक पाहता मोठ्या सभासमारंभाचे आयोजन करण्याचा राज्य मंत्रिमंडळातील सर्वांनाच मोठा अनुभव आहे. त्यांच्या राजकीय सभासुद्धा ते नेहमीच सायंकाळी घेत असतात. त्याचे कारण लोकांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि उन्हाचे निमित्त करून गर्दीने सभेकडे पाठ फिरवू नये याची खबरदारी त्यांनी घेतलेली असते. मात्र धर्माधिकारी यांच्यावरील निष्ठा आणि भक्तीपोटी येतील असा ठाम विश्वास असणाऱ्या सरकारने त्यांना उष्माघाताचा त्रास होईल या शक्यतेकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा फटका तेरा भक्तांना बसला आहे. या मृत्यूचे निरूपण करावे तरी किती? सरकार आणि त्यांचे इव्हेंट मॅनेजर अशा साध्या सोप्या गोष्टी विसरत असतील तर त्याचे भयंकर परिणाम होणारच. हे लक्षात घेतले पाहिजे. आता या परिणामाला सामोरे जाताना सरकारने महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे. यापुढे अशा प्रकारचे धाडस कोणतेही सरकार करणार नाही याची खबरदारी घेऊन तसे आदेश काढले पाहिजेत. जगातील सर्वाधिक उष्ण वातावरण महाराष्ट्रात आढळले असताना हे धाडस करून सरकारने स्वत:वर आणि भक्तांवर आफत ओढवून घेतली आहे. तरीही आता घडून गेलेल्या या दुर्घटनेबद्दल टीका करण्यापेक्षा असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी आवश्यक खबरदारी कशी घेता येईल यावर चर्चा करणे अधिक संयुक्तीक ठरेल. राज्यातील नोकरशाहीने केवळ ‘हो ला हो न म्हणता’ अशा दुर्घटनांची पूर्वकल्पना मंत्र्यांना दिली तर त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यासारखे होईल. महाराष्ट्राच्या प्रशासनानेसुद्धा हे आपले घोर अपयश आहे हे मान्य करून यापुढे चूक सुधारली पाहिजे. अन्यथा गौरव लक्षात ठेवणारी जनता त्यानिमित्ताने झालेल्या मृत्यू आणि बळींनासुद्धा विसरत नाही.
Previous Articleनऊ दिवसांच्या तेजीला सोमवारी लागला ब्रेक
Next Article तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जींना अंतरिम दिलासा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.