दाबोळीत सुरक्षा यंत्रणांची धावपळ 12 दिवसांतील दुसरी घटना
प्रतिनिधी/ वास्को
रशियातून गोव्याकडे उ•ाण केलेल्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने पुन्हा एकदा शुक्रवारी मध्यरात्री सुरक्षा यंत्रणांना आपल्या लव्याजम्यासह दाबोळी विमानतळावर धाव घ्यावी लागली. मात्र रशियातील हे विमान तातडीने उझबेकिस्तानच्या विमानतळावर उतरविण्यात आले. तेथे विमान व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. या विमानात 7 कर्मचाऱ्यांसह 240 रशियन हवाई प्रवासी होते. संध्याकाळपर्यंत हे विमान गोव्यात दाखल झाले नव्हते.
बारा दिवसांपूर्वी रशियातील अझूर एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचे वृत्त पसरल्याने मध्यरात्री दाबोळी विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा यंत्रणांनी दाबोळी विमानतळावर कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली होती. मात्र, ते विमान दाबोळीकडे न येता गुजरातच्या जामनगर विमानतळावर उतरले होते. त्या धावपट्टीवर विमान व प्रवाशांची कडक तपासणी होऊन या विमानाच्या सुरक्षेची खातरजमा करण्यात आली होती. विमानात काहीच संशयास्पद नसल्याचे आढळून आल्याने विमानात बॉम्ब असल्याचे रशियाहून गोव्यात धडकलेले वृत्त ही अफवाच असल्याचे सिद्ध झाले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी हे विमान 244 प्रवाशांना घेऊन दाबोळीत उतरले होते.
असाच प्रकार शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा घडला. पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री दाबोळी विमानतळाच्या संचालकांना रशियातील मॉस्कोहून गोव्याकडे उ•ाण केलेल्या अझूर एअरलाईन्सच्या चार्टर विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई मेल आला. त्याची पडताळणी झाल्यावर संचालकांनी सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. त्यामुळे वास्कोतील पोलिसांनी दाबोळी विमानतळावर धाव घेतली. एटीएस, श्वानपथक, अग्निशामक दल, रुग्णवाहिका अशी सारी यंत्रणा पुन्हा एकदा दाबोळी विमानतळावर दाखल झाली. सुरक्षा यंत्रणांनी सर्व सज्जता ठेवली होती. मात्र, काही वेळाने सदर चार्टर विमान उझबेकिस्तानच्या विमानतळावर तातडीने उतरविण्यात आल्याची माहिती दाबोळी विमानतळाच्या संचालकांना मिळाली. या विमानाची उझबेकिस्तानच्या धावपट्टीवर तपासणी करण्यात आली. मात्र, हे विमान शनिवारी रात्री उशिरापर्यंत दाबोळी विमानतळावर उतरले नव्हते. या विमानात 7 कर्मचाऱ्यांसह 240 प्रवासी आहेत. अझूर एअरलाईन्सचे हे विमान गोव्यात दाखल झाल्यानंतर पुन्हा रशियाकडे प्रयाण करणार आहे. शनिवारी संध्याकाळी दाबोळी विमानतळावर रशियन प्रवासी या विमानाच्या प्रतिक्षेत होते.









