तीन लाख रुपये घेतल्याचा आरोप : सर्व नगरसेवक सत्ताधारी गटातील
बेळगाव : बदली थांबविण्यासह सहकार्य करतो, असे सांगून सत्ताधारी गटाच्या तत्कालीन गटनेत्यासह सात नगरसेवकांनी आपल्याकडून तीन लाख रुपये घेतले आहेत, अशी लेखी तक्रार महापालिकेतील एका निरीक्षकांनी महापौर मंगेश पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. तक्रारदार निरीक्षक यापूर्वी महानगरपालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 8 ते 14 चे प्रभारी महसूल निरीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यानच्या काळात 10 जानेवारी 2024 रोजी एका समाजाच्यावतीने निरीक्षकाविरोधात मनपा आयुक्तांना निवेदन दिले. त्यावेळी निरीक्षकाने सत्ताधारी गटाच्या तत्कालीन गटनेत्यांची भेट घेऊन या प्रकरणावर तोडगा काढण्याची विनंती केली. त्यावेळी कमिटीसोबत चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. काही दिवसांनंतर निरीक्षकाला फोनवर संपर्क साधून सर्व निरीक्षकांची बैठक बोलाविण्यात आली. सभा संपल्यानंतर तुमच्या विषयाबद्दल बोलू व तोडगा काढू, असे सांगण्यात आले होते.
सभा शहरातील एका प्रसिद्ध देवस्थानाच्या कार्यालयात घेण्यात आली होती. सभा संपल्यानंतर तक्रारदार निरीक्षकाला बोलाविण्यात आले. सर्व सात नगरसेवकांनी निरीक्षकाच्या समस्येबाबत चर्चा केली. तुमच्यावर करण्यात आलेल्या आरोपातून दोष मुक्त करण्यासह तुम्ही सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणाहून आम्ही असेपर्यंत तेथून तुमची बदली करणार नाही, मात्र या मोबदल्यात तुम्ही आम्हाला तीन लाख रुपये दिले पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दोनवेळा तत्कालीन सत्ताधारी गटनेत्यांनी फोनवर संपर्क साधून आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यावेळी लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करू, असे सांगून निरीक्षक येथून निघून गेला. निरीक्षकाने आपल्या बहिणीच्या नावे एका फायनान्समधून घरावर तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले व ती रक्कम आपल्या मित्राच्या माध्यमातून एका विद्यमान स्थायी समितीचा अध्यक्ष असलेल्या नगरसेवकाकडे दिली. पैसे देऊनदेखील बदली करण्यासह मानसिक त्रास देण्यात आल्याने मनपातील त्या निरीक्षकाने सत्ताधारी गटातील सात नगरसेवकांच्या विरोधात नुकतीच महापौर मंगेश पवार यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात महापौर कोणती भूमिका निभावणार, हे पहावे लागणार आहे.









