भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र : युवा समितीच्या तक्रारीची दखल
बेळगाव : राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील मराठी-इंग्रजी फलकांवर महानगरपालिकेकडून रंग फासण्यात आला होता. या कारवाई विरोधात म. ए. युवा समितीने भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन भाषिक अल्पसंख्याक आयोगाने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबतचा अहवाल मागविला आहे. बेळगाव महानगरपालिकेने शहरातील आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी फलकांना लक्ष्य केले होते. 30 ऑक्टोबर रोजी काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड यासह शहरातील इतर भागात मराठी व इंग्रजी लिहिलेल्या फलकांना रंग फासण्यात आला होता. यामुळे व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त होत होती. युवा समितीने या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करून भाषिक अल्पसंख्याक आयोगाला पत्र पाठविले होते. युवा समितीच्या पत्राची दखल घेऊन भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे साहाय्यक आयुक्त एस. शिवकुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल देण्याची सूचना केली आहे. याची एक प्रत युवा समितीला पाठविण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र…
भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे साहाय्यक आयुक्त एस. शिवकुमार दि. 18 व 19 फेब्रुवारी 2025 रोजी बेळगावमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाषिक अल्पसंख्याकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यांच्या या दौऱ्याचा अहवाल अद्याप पाठविण्यात आलेला नाही. तसेच बैठकीनंतर कोणती कारवाई केली याची माहिती देण्यात आलेली नाही. चारवेळा स्मरणपत्र पाठवूनही याचा अहवाल पाठविण्यात आला नसून पुन्हा एकदा स्मरणपत्र 31 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.









