आनंदनगर परिसरात गस्त सुरू : वडगाव स्मशान रोडवर घरफोडीचा प्रयत्न : घराच्या आवारात बांधलेली बकरी चोरीला
बेळगाव : उपनगरांतील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या चोरी प्रकरणांतील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणेने संपूर्ण रात्र जागविली तरी गुन्हेगार काही पोलिसांच्या जाळ्यात अडकला नाही. पोलीस आनंदनगर परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी गुन्हेगाराने वडगाव स्मशान रोड परिसरात चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती हाती आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून वडगाव, अनगोळ परिसरात एकाच गुन्हेगाराचा उच्छाद सुरू आहे. रोज एक-दोन घरे फोडून तो दागिने लांबवतो आहे. या आठ दिवसांत अनेकवेळा नागरिकांबरोबर चोराची झटापटही झाली आहे. त्यामुळेच त्याला अटक करण्यासाठी बुधवार दि. 20 डिसेंबरच्या रात्री शहरातील संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पोलीस अधिकारी आनंदनगर परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी त्या गुन्हेगाराने स्मशान रोड, वडगाव येथे घरफोडीचा प्रयत्न केला आहे. या परिसरातील एका घराला बाहेरून कडी लावताना त्याचा आवाज घरातील महिलेला आला. तिने बाहेरचा लाईट लावताच चोरट्याने तेथून पळ काढला. याचवेळी कुत्र्यांचे भुंकणेही वाढले होते.
खिडकीतून कोणी तरी पळून जाताना पाहून त्या महिलेने आपल्या कुटुंबीयांना जागे केले. परिसरातील नागरिक फोनवरून एकमेकांशी संपर्क साधून एकाचवेळी घरातून बाहेर पडले. तोपर्यंत गुन्हेगार तेथून पळून गेला होता. याच परिसरातील आकाश नांगनूरकर यांच्या घराच्या आवारात बांधलेली बकरी चोरीला गेली आहे. मध्यरात्री 2.30 ते 3 यावेळेत दरवाजांना बाहेरून कडी लावताना आवाज आला. सध्या उपनगरात चोऱ्या करणारा गुन्हेगार एखाद्या घरात शिरण्यापूर्वी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावतो. जर घरातील मंडळींनी जाग येऊन आरडाओरड केली तरी त्यांच्या मदतीला कोणी धावून येऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी चोरटा घरांना बाहेरून कड्या लावतो. कडी लावतानाच एका महिलेला जाग आल्याने स्मशान रोड परिसरात चोरीचा प्रयत्न फसला आहे. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी आनंदनगर परिसरातून आपला मोर्चा स्मशान रोड परिसरात वळविला. तोपर्यंत चोरट्याने तेथून पळ काढला होता. यासंबंधी ‘तरुण भारत’ने गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता शहरात धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले.









