मुख्यमंत्री करणार औपचारिक निवेदन : शिरगांव जत्रोत्सवातील चेंगराचेंगरी प्रकरण
पणजी : शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सत्य-शोधन’ समितीने आपला अंतिम अहवाल गुऊवारी मुख्यमंत्री कार्यालयाला सादर केला आहे. सरकार आता त्यातील निष्कर्षांची तपासणी करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यावर अंतिम निर्णय घेऊन औपचारिक निवेदन करणार आहेत. शिरगाव जत्रोत्सवात झालेल्या या चेंगराचेंगरी प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. पाच दिवसानंतर त्या समितीने हा अहवाल मुख्य सचिव डॉ. वी. कंदवेलू यांच्याकडे सादर केला आहे. सुमारे 100 पानी सदर अहवालावर आता सरकारच पुढील निर्णय घेणार आहे, अशी माहिती जॅकीस यांनी दिली.
मात्र सदर अहवालाबाबत अधिक माहिती देण्यास नकार देताना त्यांनी, मुख्यमंत्रीच त्यावर भाष्य करतील असे सांगितले. गत शनिवारी दि. 2 मे रोजी शिरगावात जत्रोत्सव होता. त्यावेळी पहाटेच्या दरम्यान देवीचे धोंडगण आणि भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. त्यात सहा जणांना मरण आले होते. त्याशिवाय अन्य सुमारे 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. पैकी काही जणांवर अद्याप विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. गोव्याच्या इतिहासातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना होती. त्यामुळे ती सरकारच्याही डोळ्यात अंजन घालणारी ठरल्यामुळे भविष्यात केवळ शिरगावच नव्हे तर अन्य ठिकाणी जत्रोत्सव किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमादरम्यान तिची पुनरावृत्ती होण्याची शक्यता गृहित धरून सदर घटनेच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीत श्री. जॅकीस यांच्यासोबत डीआयजी रेंज वर्षा शर्मा, वाहतूक संचालक प्रवीमल अभिषेक तसेच दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा आदींचा समावेश होता. समितीने जिल्हाधिकारी, पोलिस, देवस्थान समिती तसेच जखमी यांचे जबाब नोंदविले. त्याशिवाय घटनास्थळावरील व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा आणि गर्दी नियंत्रणासंबंधी गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काही ठोस सूचना देखील केल्या आहेत. सदर अहवाल सादर करण्यास काही तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला होता. मुख्यमंत्री लवकरच या अहवालावर निर्णय घेणार असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक कारवाईचे निर्देश देणार आहेत.









