कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
महागाई कमी होण्यासाठी व आर्थिक चक्रे फिरण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 12 लाख उत्पन्नावर आयकर सूट देण्याची घोषणा केली आहे. याच्या पाठोपाठ शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये .25 टक्के इतकी कपात केल्याने, बँकांच्या व्याजाचे दर कमी होणार आहे. यामुळे विशेषत: कोल्हापुरातील बांधकाम विक्रीला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे. याची अंमलबजावणी 9 एप्रिलपासून होणार आहे.
रिझर्व्ह बँकेची पतविषयक धोरण समितीची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत रिझर्व्ह बँकेकडून बँकांना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याज दरात (रेपो रेट) 6.50 वरून 6.25 कपात केली. .25 टक्के बेसिस पाँईटमध्ये कपात होणार आहे. यामुळे कर्जावरील व्याज दर कमी होणार आहेत. विशेषत: गृह कर्जावरील ईएमआयचा हप्ता कमी होणार आहे. अंदाजे 15 वर्षासाठी लाखाला 935 रुपये ईएमआय भरणाऱ्या गृह कर्जदाराला आता अंदाजे 850 रुपये भरावे लागणार (बँकांच्या व्याजनुसार दर) असल्याचे बँक सूत्राकडून सांगण्यात आले.
सध्या कोल्हापुरात नवीन 297 बांधकाम प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर पंतप्रधान योजनेमधील परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प ही सुरू आहे. यातील काही प्रकल्प फुलेवाडी येथे साकारला असून, रहिवासीही राहण्यास गेले आहेत. परवडणाऱ्या घरासाठी आयकर सूट, वाढीव एफएसआय तसेच शासनाचे अनुदान यामुळे ही घरे स्वस्त पडतात. याबरोबरच शहरात जुन्या बांधकामाना ही पुर्नविकासाला ही चालना मिळू लागली आहे. आज शहरात बांधकामाचा दर स्क्वेअर फूटाला 2500 रूपये, तर तयार फ्लॅटचा दर एरियानुसार 5000 पासून 7000 रूपये स्क्वेअर फूट असा आहे. मार्च एडिंग असल्याने, कोणतेही कर्ज पुरवठा होणार नाही. 9 एप्रिलनंतर नवीन रेपो रेटची अंमलबजावणी होणार असल्याने, एप्रिलपासून बँकेत गृह कर्ज मागणी वाढणार आहे.
- कर्जाची मागणी वाढणार
गृह कर्जासाठी फिक्स व बदलते कर्ज असे दोन प्रकार आहेत. यामध्ये फिक्स कर्ज घेणाऱ्यांना याचा फायदा होणार नाही. कारण व्याज दर हा कर्ज भरेपर्यंत फिक्स असतो. तर बदलत्या कर्जदरामध्ये व्याज दर कमी वा वाढ ही होऊ शकतो. गुरुवारी रेपो रेट कमी झाल्याने, गृह कर्जावरील व्याज ही कमी होणार आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. ज्यांचे सिबील चांगले असेल त्यांनाच कर्ज मिळणार आहे.
–चार्टर्ड अकोंटंट, सुनील नागांवकर
- –टू बीएच ची मागणी वाढणार
12 लाखांपर्यंत आयकर सूट, घटलेला रेपो रेट यामुळे लोकांकडे पैशाचे चलन फिरणार आहे. यामुळे नवीन घर, फ्लॅट खरेदीकडे लोकांचा कल वाढणार आहे. रेपो रेट घटणार असल्याने, इच्छुकांकडून वन बीएचके पेक्षा टू बीएचकेची मागणी वाढणार आहे.
–सचिन ओसवाल, उपाध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर








