प्रतिनिधी,कोल्हापूर
पुरोगामी चळवळीतील विचारवंत गोविंद पानसरे यांच्या खून होऊन आठ वर्षे झाली. पण मुख्य आरोपी अजूनही सापडले नाहीत. ते का सापडत नाहीत, असा प्रश्न करत गोविंद पानसरे स्मृतिजागर समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
गोविंद पानसरे स्मृतिजागर समितीच्या वतीने पानसरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जवाब दो मोर्चाचे आयोजन केले होते.
दसरा चौकातून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो, राज्य सचिव सुभाष लांडे, माकपचे राज्य सचिव उदय नारकर, भाकपचे कंट्रोल कमिशन सदस्य दिलीप पवार, जिल्हा सचिव सतीश कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पानसरे यांच्या खुनाला आठ वर्षे झाली. पण ते सापडत नाहीत, या कटातील मुख्य सूत्रधारला कधी अटक होणार अशी विचारणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उत्तर द्यावे, असे आव्हान दिले. यावेळी पानसरे यांच्या खुन्यांना अटक करण्यासह ‘पानसरे अमर रहे’ च्या घोषणा देण्यात आल्या.
दसरा चौकातून सुरु झालेला मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. याठिकाणी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चा विसर्जित केला. मोर्चात लाल निशाण पक्षाचे जिल्हा सचिव अतुल दिघे, मेघा पानसरे, एस. बी. पाटील, सदाशिव निकम, रघुनाथ कांबळे, श्रीराम भिसे, हरिष कांबळे, रवी जाधव, बाबुराव तारळी, अनिल लवेकर, सुशिल लाड, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, दिलदार मुजावर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.
Previous Articleबसरीकट्टी गावात युवकाचा खून; विहिरीत आढळला मृतदेह
Next Article संग्राम कुपेकर यांना भाजपची ‘ऑफर’









