प्रतिनिधी /पणजी
सर्व सरकारी इमारतींसाठी अग्नी सुरक्षा तपासणी सुरु करण्यात आली असून अनेक इमारतीत जुनी यंत्रणा आढळल्याने तेथे नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याच्या सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्या आहेत. अग्निशामक सेवेत महिला जवानांची भरती सुरू करण्यात आली असून नवे मुख्यालय मार्च 2023 पर्यंत कार्यरत होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अग्निशामक सेवेतील ताफ्यात दाखल करण्यात आलेल्या दोन वाहने व तीन बोटींचे उद्घाटन आणि शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. सांतईनेज पणजी येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयात झालेल्या सदर कार्यक्रमात त्यांनी बोटी, वाहने अग्निशामक सेवेत अर्पण केली. महिलांना या सेवेत घेण्यासाठी भरती नियम बदलण्यात येतील, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले की, अग्निशामक दलाचे काम कौतुकास्पद असून त्यांना अत्याधूनिक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राहत्या तसेच कामाच्या ठिकाणी अग्निपासून सुरक्षा महत्त्वाची असून त्याकरीता खाते सातत्याने प्रयत्न करीत आहे. आगीपासून अनेक लोकांची सुटका करण्यात तसेच कोटय़वधींची मालमत्ता वाचवण्यात दलास यश आल्याचे त्यांनीन नमूद केले.
नवीन मुख्यालयात मुख्य कार्यालय, अग्निशामक केंद्र, निवास कक्ष, प्रशिक्षण व कॉन्फरन्स हॉल आणि इतर सोयी सुविधा देण्यात आल्या असून ते मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.









