येळ्ळूर येथील ग्रा. पं. सदस्यांची हेस्कॉमकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : येळ्ळूर येथील जुने विद्युतखांब, विद्युतवाहिन्या धोकादायक ठरत आहेत. यामुळे अनेकवेळा अपघात होत असून जुने विद्युतखांब व वाहिन्या तात्काळ बदलाव्यात, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे व जोतिबा चौगुले यांनी हेस्कॉमकडे निवेदनाद्वारे केली आहे. गावातील पाटील गल्ली, लक्ष्मी गल्ली, कलमेश्वरनगर, प्रताप गल्ली, सांबरेकर गल्ली या परिसरात अनेक वर्षांपूर्वी वीजवाहिन्या ओढण्यात आल्या होत्या. परंतु, या विद्युतवाहिन्या सध्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून हेस्कॉमने याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. यापूर्वी कलमेश्वर गल्ली, विराट गल्ली, मारुती गल्ली, गोडी विहीर परिसरात नवीन विद्युतखांब व वाहिन्या ओढण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे आता उर्वरित परिसरातही नवीन विद्युतवाहिन्या घालण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सेक्शन ऑफिसर वाणी व ज्युनियर इंजिनिअर लोबो उपस्थित होते.









