बांधकाम कामगार संघटनेचे आंदोलन
बेळगाव : कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. त्याचबरोबर कामगारांचे लग्न असो किंवा कामगारांच्या मुलांचे लग्न असो त्यांना आर्थिक मदत केली जाते. मात्र ती मदत करण्याकडे कामगार कार्यालयाने दुर्लक्ष केल्यामुळे कामगारांच्यावतीने मजगाव येथील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी विविध मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. काही भागातील कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली तरी काही भागातील कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. बऱ्याच जणांना लग्नाला देण्यात येणारी मदतही दिली गेली नाही. किटची समस्या तर नेहमीचीच आहे. वास्तविक सर्वच कामगारांना किट देणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तातडीने या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मजगाव येथील कामगार कार्यालयातील साहाय्यक आयुक्त तरनम् बेंगाली यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर, राहुल पाटील, अॅड. आरती पाटील, शीतल बिलावर, सुरेश मरकाचे व कामगार उपस्थित होते.









