वकिलांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. यातच पुन्हा कडधान्य आणि इतर धान्यांवर 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा महागाईचा भडका उडणार असून सर्वसामान्य जनतेला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. तेव्हा अन्यायकारक लागू करण्यात आलेला जीएसटी तातडीने रद्द करावा, अशी मागणी वकिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनानंतर सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. आता त्यामध्ये काहीशी सुधारणा झाली. मात्र अचानकपणे कडधान्य व इतर धान्यांवर जीएसटी लागू केल्यामुळे पुन्हा सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास महागाईचा भडका उडून उदेक होईल. तेव्हा केंद्र सरकारने याचा पुनर्विचार करून लागू करण्यात आलेला जाचक जीएसटी रद्द करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. जीएसटी रद्द झाला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे हे निवेदन दिले आहे. यावेळी ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. शरद देसाई, ऍड. सुभाष मोदगेकर, ऍड. पी. एम. भंडारे, ऍड. महांतेश हिरेमठ, ऍड. यल्लेश पुरी, ऍड. राजू कांबळे,
ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. पेमीला हंपण्णावर यांच्यासह वकील उपस्थित होते.









