बेळगाव : शहर व उपनगरातील प्रवाशांना सोयीचे होण्यासाठी शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसस्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. सदर बसस्थानकांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. आता शहरातील स्मार्ट बसस्थानकांचे दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या साहाय्याने बसस्थानकांची दुरुस्ती करण्यात येत असून सुसज्ज करण्यात येत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून शहरातील बसस्थानकांची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली नव्हती. यामुळे सदर बसस्थानके समस्यांच्या गर्तेत होती. त्याचबरोबर भटक्या जनावरांचा वावरही या बसस्थानकांमध्ये वाढला होता. दयनीय अवस्थेमुळे प्रवाशीही फारसा बसस्थानकांचा वापर करत नसल्याचे दिसून येत होते. यामुळे बसस्थानकांची दुरुस्ती करणे गरजेचे बनले होते.
समस्यांची दखल घेऊन व बसस्थानके दुरुस्ती करण्याच्या उद्देशाने निविदेद्वारे कंत्राटदाराला काम सोपविण्यात आले. कंत्राटदाराने बसस्थानक दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. छत्रपती शिवाजीनगर येथील बसस्थानकाची दुरुस्ती करण्यात येत आहे. या परिसरात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. प्रवाशांना समस्या होऊ नयेत, यासाठी तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन बसस्थानके सुसज्ज करण्यात येत आहेत.









