रामदेव गल्ली येथे बदलल्या विद्युतवाहिन्या
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून शहरातील धोकादायक विद्युतवाहिन्या व ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती केली जात आहे. मंगळवारी बाजारपेठेतील रामदेव गल्ली परिसरात मागील 20 ते 25 वर्षांपूर्वीच्या विद्युतवाहिन्या काढून एरियल बंच केबल घालण्यात आल्या. यामुळे दुपारी काहीकाळ रामदेव गल्ली येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मागील महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवाच्या तयारीबाबत पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांनी विद्युतवाहिन्यांबाबत तक्रारी दाखल केल्या. शहराच्या बऱ्याचशा भागात जुन्या विद्युतवाहिन्या असून त्यावरील आवरण खराब झाल्याने धोका निर्माण झाल्याची तक्रार केली होती. तसेच विसर्जन मार्गावर विद्युतवाहिन्यांची उंची वाढविण्याची मागणी केली होती. विसर्जन मार्गातील रामदेव गल्ली येथे जुन्या विद्युतवाहिन्या धोकादायक ठरत होत्या. 20 ते 25 वर्षे जुन्या असणाऱ्या विद्युतवाहिन्यांचे आवरण खराब झाले होते. त्याठिकाणी एरियल बंच केबल घालण्यात आल्या. यामुळे दुपारी हुतात्मा चौक ते समादेवी गल्ली हा रस्ता काहीकाळासाठी बंद ठेवण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने नवीन विद्युतवाहिन्या घालण्यात आल्या. यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमधून समाधन व्यक्त केले जात आहे.









