दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मडगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कुंकळळी बसस्थानकाच्या छताची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी करणारे निवेदन कुंकळळी नागरी आणि ग्राहक मंचने दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू ए. यांना सादर केले आहे. कुंकळळी नागरी आणि ग्राहक मंच ने कुंकळळी बसस्थानकाच्या छताची दुरूस्ती केली नसल्याने चिंता व्यक्त केली आहे. कुंकळळी बसस्थानकाच्या छताच्या पत्र्यांची स्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. जी बऱ्याच काळापासून खराब स्थितीत आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकींमध्ये अनेक वेळा छताच्या परिस्थितीची माहिती वाहतूक संचालनालय आणि कदंब महामंडळ लिमिटेडच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बसस्थानकाचे खराब झालेले छत, फलक नसणे, बसच्या वेळा न दाखवणे आदींबरोबरच बसस्थानकाचीही तपासणी करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. परंतु, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, कारण बसस्थानकाच्या छताची दुऊस्ती न केल्यास सतत गळती होत राहते, वाऱ्यामुळे छताचे पत्रे उडून जाण्याची शक्यता नाकारली जात नाही. छताला गळती लागल्यामुळे बसस्थानकाच्या आतील भागात पावसाचे पाणी साचते आणि त्यामुळे तळ मजला निसरडा होत असल्याने या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना धोका असतो असे निवेदनात म्हटले आहे. बसस्थानकावरील या स्थितीमुळे पावसाळ्यात ग्राहकांचे जीव प्रामुख्याने विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक धोक्मयात येतील. हे लक्षात घेऊन त्वरित उपाय योजना आखावी अशी मागणी करण्यात आली आहे. बसस्थानकात सुरू असलेल्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरू नये यासाठी मागील वषी छताची एक बाजू निळ्या प्लास्टिकच्या पत्र्याने झाकण्यात आली होती याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या निवेदनाच्या पत्राच्या प्रती वातहूक संचालक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, व्यवस्थापकीय संचालक केटीसीएल, यांना पाठवण्यात आल्या आहेत.









