अधिकाऱ्यांना नागरिकांचे निवेदन
खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावरील कान्सुली क्रॉस ते मुगवडे मार्गावर असलेल्या मलप्रभा नदी पुलापासून ते मुघवडे क्रॉसपर्यंत असलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावा, अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा निलावडे ग्राम पंचायतचे अध्यक्ष अरुण गावडे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संजय गस्ती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या भागातील आंबोळी, निलावडे, बांदेकरवाडा, मुघवडे, कोकणवाडा, कबनाळी, मळवसह इतर गावे आहेत.
ही सर्व गावे दुर्गम भागात आहेत. कान्सुली क्रॉस ते मुघवडेपर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनिय झाली असून या रस्त्यावरुन प्रवास करताना या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकवेळा दुचाकीचे अपघात घडत आहेत. या संपूर्ण परिसरात ऊस लागवड मोठ्याप्रमाणात करण्यात येते. सध्या ऊसतोड हंगाम तोंडावर आला आहे. या रस्त्यावरुन ऊस वाहतूक करताना अपघाताची शक्यता आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या भागातील नागरिकांना दिला आहे. यावेळी निलावडे ग्रामपंचायत अध्यक्ष अरुण गावडे, राजाराम कांबळे, शिवाजी पार्सेकर, गणपती पार्सेकर, शिवाजी कोळेकर, निंगाप्पा पार्सेकर, भुजंग पार्सेकर, महादेव पार्सेकर, हणमंत पार्सेकर यासह या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









