विनायक गुंजटकर यांची प्रशासनाकडे मागणी
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांमुळे वाहने चालविणे अवघड झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अनगोळ चौथे रेल्वेगेट येथे अंडरपास ब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहतूक तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलामार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे वाहनांची संख्या वाढली असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
सकाळी व सायंकाळी शाळा, कारखाने सुटण्याच्या वेळेस रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. पावसाळ्यात चौथ्या रेल्वेगेटचे काम सुरू करण्यात आले. परंतु, बांधकाम कंपनीने महानगरपालिकेची परवानगी न घेता काम सुरू ठेवल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे मोठा रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, या ठिकाणी नागरी वसाहती असल्यामुळे स्थानिकांचा विचार करून रस्ता करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.









