येत्या आठ दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा भाजप कार्यकर्त्यांकडून इशारा
खानापूर : खानापूर-असोगा रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून डबक्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. या रस्त्यावरुन वाहन चालविताना अनेकवेळा अपघात होत आहेत. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची येत्या आठ दिवसात रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती करून हा रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. चेतन मणेरीकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
खानापूर, असोगा रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूचा रस्ता रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. तसेच भुयारी मार्गासाठी कंत्राटदाराने कोणतेही योग्य नियोजन न करता पावसाळ्याच्या तोंडावरच भुयारी मार्गाचे काम सुरू केल्याने भुयारी मार्गासाठी खोदण्यात आलेल्या चरीमुळे या ठिकाणी मोठ्या प्र्रमाणात पाणी साचून तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे. या ठिकाणी पाणी साचल्याने रस्ताच खचल्याने अगदी अरुंद रस्ता शिल्लक राहिला आहे. रेल्वेस्टेशनपासून ते फाटकापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
चारचाकीची मोठी वर्दळ
भुयारी मार्गासाठी खोदण्यात आलेल्या जमिनीमुळे पावसाचे पाणी साचल्याने रस्ता खचला आहे. कंत्राटदाराने तात्पुरती डागडुजी करून रस्ता खचण्यापासून बचाव केला असला तरी हा रस्ता केंव्हाही खचून वाहतुकीसाठी रस्ता बंद होऊ शकतो. तसेच फाटकाच्या दोन्ही बाजूकडील जवळपास दीड कि. मी. रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. या रस्त्यावरुन असोगा, मन्सापूर, कुटिन्होनगर, भोजगाळी, मणतुर्गा यासह इतर गावांसाठी मोठ्या प्रमाणात संपर्क साधला जातो. त्यामुळे या रस्त्यावरुन दुचाकी आणि चारचाकींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतू रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दुचाकीवरून पडून महिलाही जखमी
या रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकवेळा दुचाकींचे अपघात घडत आहेत. महिलावर्गांच्याही दुचाकीवरुन पडण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अन्यथा या भागातील ग्रामस्थांना घेऊन उग्र आंदोलनाचा इशारा अॅड. चेतन मणेरीकर यांनी दिला आहे.









