नागरिक-पर्यटकांतून मागणी : अन्यथा आंदोलनाचा इशारा
बेळगाव : राजहंसगडावर सर्व विकासकामे करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सिद्धेश्वर मंदिराचाही कायापालट करण्यात आला. एक आकर्षक असे पर्यटनस्थळ तयार करण्यात आले आहे. मात्र, राजहंसगडपासून गडावर जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. मोठे ख•s पडल्यामुळे वाहने चालविणे किंवा पायी चालत जाणे कसरतीचे ठरत असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांबरोबरच पर्यटकांतून होत आहे.
सध्या राजहंसगडाच्या पर्यटनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक राजहंसगडावर जाऊन नयनरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत आहेत. रविवारी तर या ठिकाणी अक्षरश: झुंबड उडत आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे गडाचा परिसर फुलून जात आहे. मात्र, राजहंसगड गावापासून गडावर जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
राजहंसगडाचा संपूर्ण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. बऱ्याच प्रमाणात विकासही झाला आहे. मात्र, रस्त्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. सध्या हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला असून दगड बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहने चालविणे कसरतीचे ठरत आहे. गडावरून खाली उतरताना अपघात घडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. तेव्हा तातडीने याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम खाते व पर्यटन विभागाने या रस्त्याचे डांबरीकरण करणे महत्त्वाचे आहे.









