लहान वाहनांसाठी धोकादायक ठरत असल्याने चालकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गोगटे सर्कल येथील बसवेश्वर ओव्हरब्रिजवरील लोखंडी पट्टी सुटली असल्याने ती लहान वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. ये-जा करणारी वाहने या पट्टीवरून जात असल्याने मोठा आवाज होत असून, ती वाहनांमुळे आपटत आहे. त्यामुळे प्रशासनाने ओव्हरब्रिजवरील लोखंडी पट्टीची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
बसवेश्वर ओव्हरब्रिजवर दोन गर्डरमध्ये लोखंडी पट्ट्या घालण्यात आल्या आहेत. यातील एक लोखंडी पट्टी मूळ फौंडेशनमधून सुटली असून, त्यावरून वाहन गेल्यास त्याचा आवाज होत आहे. वाहन पुढे सरकल्यानंतर ती पट्टी जमिनीवर आदळून पुन्हा वर येत आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकीला अपघात होवू शकतो. रात्रीच्यावेळी हा प्रकार लक्षात न आल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोखंडी पट्टीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









