अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
वार्ताहर/नंदगड
खानापूर-तालगुप्पा राज्य मार्गापासून लालवाडी क्रॉस ते चापगावपर्यंतचा रस्ता नादुरुस्त झाला आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. लालवाडी-चापगाव हा सुमारे सात किलोमीटरचा रस्ता नागरगाळी- कटकोळ रस्त्यादरम्यानचा काही भाग आहे. नागरगाळी, हलशी, नंदगड, लालवाडीपासून कारलगा, शिवोली, अल्लेहोळ ते चापगावपर्यंत त्यानंतर तो काटकोळपर्यंत रस्ता जातो. लालवाडीपासून ते चापगांवपर्यंतच्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या भागात गेल्या पंधरा दिवसापासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यातील खड्यातून साचल्याने रस्त्यावर तळ्dयाचे स्वरूप प्राप्त होत आहे. खड्डे चुकवून वाहन चालवताना चालकाची त्रेधातिरपीट उडत आहे. यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची गैरसोय
गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून अनेकवेळा मागणी करण्यात आली. परंतु संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षच होताना दिसत आहे. पावसामुळे तर लोकांची मोठी कुचंबणा झाली आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा मार्ग हाती घेतला जाणार असल्याची माहिती लालवाडी, कारलगा, चापगाव भागातील जनतेने दिली आहे.









